ऑनलाईन टीम / जेरुसलेम :
इस्राईल आणि पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा संघर्ष पेटला आहे. सोमवारी रात्री हमासने इस्राईलच्या दिशेने 100 क्षेपणास्त्रे डागली. इस्राईलकडूनही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यामध्ये या नऊ लहान मुलांसह 24 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
जेरूसलेममध्ये अल-अक्सा मशिदीजवळ इस्राईलच्या सुरक्षा दलांसोबत झालेल्या संघर्षामध्ये शेकडो पॅलेस्टिनी जखमी झाल्यानंतर सोमवारी (10 मे) कट्टरपंथी संघटना असलेल्या हमासने इस्राईलवर हल्ला करण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, हमासकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर इस्राईलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटलं की, हमासने आपली मर्यादा ओलांडली आहे आणि इस्राईल याला पूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर देईल. पॅलेस्टाईनने हल्ला केल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावे लागले.
आज जेरुसलेम दिनाच्या औचित्याने निघणाऱ्या फ्लॅग मार्चदरम्यान शहरात हिंसा होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अमेरिका, ब्रिटन आणि यूरोपीय संघाने इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनला लवकरात लवकर तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे.









