ऑनलाइन टीम / मुंबई :
8 एप्रिल रोजी हनुमान जयंती आणि शब्ब ए बारात साजरी करण्यात येते. मात्र, नागरिकांनी हे दोन्ही कार्यक्रम घरात बसूनच साजरे करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. यावेळी पवार यांनी हटके अंदाजात हे आवाहन केले आहे.
अजित पवार म्हणाले, उद्या हनुमान जयंती आहे. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडू नका. लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानाने औषधी वनस्पतीसाठी पर्वत उचलून आणला होता. आज जनतेला वाचवण्यासाठी हनुमाना सारखं पर्वत आणायची गरज नाही. त्यामुळे उद्या घरीच थांबा आणि घरातच हनुमान जयंती साजरी करा असे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच मुस्लिम बांधवांना ही शब्ब ए बारातसाठी घराबाहेर पडू नये, घरातच थांबावे असं म्हटलं आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे, अरे कोणचा जीव वाचवणे हे आता देशातील प्रत्येक व्यक्तीचे अहं कर्तव्य तसेच जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व सण, पूजा, अर्चा, प्रार्थना, जत्रा आदी धार्मिक कार्ये घरीच करावीत.
जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा देताना पवार म्हणाले, आधुनिक काळात वैयक्तिक आरोग्याबरोबरच, सार्वजनिक, जागतिक आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हे या कोरोना च्या संकटामुळे सर्वांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता भविष्यातही वैयक्तिक आरोग्याबरोबरच सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया, असं ही पवार म्हणाले.









