कृती समितीच्या बैठकीत आवाहन
प्रतिनिधी / कोल्हापूर
हद्दवाढीच्या विरोधातील कृती समिती पुन्हा एकदा आक्रमक झाली असून 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी होणार्या गावसभेत हद्दवाढीच्या विरोधात ठराव करा, असे आवाहन कृती समितीचे अध्यक्ष माजी आमदार संपतबापू पवार पाटील यांनी केले. हद्दवाढीवर चर्चा करण्यासाठी बुधवारी टेंबे रोड येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
मागील वेळी गावांच्या एकजुटीने हद्दवाढ हाणून पाडली होती. याची दखल घेत महाविकास आघाडी सरकारने प्राधिकरणाचा निर्णय घेतला. प्रशासकिय इमारतीत कार्यालय सुरु केले. मात्र तेथे पुरेसा अधिकारी, कर्मचारी वर्ग नाही. या मूळ दुखण्याकडे दुर्लक्ष करुन पुन्हा हद्दवाढीसाठी प्रयत्न सुरु आहेत. हा प्रयत्न ग्रामीण जनतेच्या मुळावर उठणार आहे. त्यामुळे आधी शहर सुधारा मगच आमच्याकडे या, असे पुन्हा एकदा ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात 26 जानेवारीच्या गावसभेत यावर प्रामुख्याने चर्चा करा, एकमुकाने हद्दवाढीच्या विरोधात ठराव करुन समितीकडे पाठवण्यात यावेत, असे आवाहन करण्यात आले. बैठकीला निमंत्रक राजू माने, नारायण पवार, बी. ई. पाटील, कळंबा, वाशी आदी 18 गावातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.








