नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
प्रतिनिधी/ सातारा
सातारा नगरपरिषदेनेचे हद्दवाढ क्षेत्राचा 51 कोटींचा विकास आराखडा दिला असून यासाठी लवकरच निधी दिला जाईल, असे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
सातारा नगरपरिषदेच्या विविध प्रश्नांवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेऊन हद्दवाढ क्षेत्राचा विकास आराखडा, नाविन्यपूर्ण योजनेतुन नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकामासाठी निधी, कासची उंची वाढवण्याच्या कामाला निधी तसेच कासची बंदिस्त पाईपलाईनकरीता निधी, कर माफीबाबत राज्यशासनाची मान्यता, नवीन विद्युत दाहिनी, इत्यादी मुद्यांवर चर्चा केली.
या चर्चेच्या अनुषंगाने उदयनराजेंनी पत्रकात नमूद केले आहे की, नगरपरिषदेच्या सुमारे 40 ते 50 वर्षामध्ये पहिल्यांदाच सप्टेंबर 2020 मध्ये हद्दवाढ झाली आहे. हद्दवाढ क्षेत्रातील खेड, गोडोली, विलासपूर, शाहुपूरी, करंजे, दरे खुर्द, कोडोलीचा काही भाग, शाहुनगरमधील आणि गोडोलीचा त्रिशंकु भाग येथील सुमारे 160 कि.मी. लांबीचे रस्ते, 17 कि.मी. लांबीची गटर्स/पाईपड्रेन, पोलसह सुमारे 100 स्ट्रीट लाईटस, याकरीता तसेच या परिसरातील ओपन स्पेसचा विकास, फाशीचा वड, चारभिंती, अजिंक्यतारा परिसर, तलाव, इत्यादी ठिकाणी नवीन बागा, ओपन जीम, ठिकठिकाणी वृक्षारोपण इत्यादी अनेक विकासकामांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. सदर 51 कोटी 41 लाख रुपयांचा आराखडा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना नगरपरिषदेच्या वतीने सादर करण्यात आला.
नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीकरीता 1 रुपयामध्ये पदमश्री बाबासाहेब कल्याणी यांच्याकडून नगरपरिषदेने सुमारे 40 गुंठे जागा खरेदी केलेली आहे. सदर जागेवर प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. त्याकरीता राज्यशासनाने वैशिष्टयपूर्ण/नाविन्यपूर्ण योजनेमधुन सातारा नगरपरिषदेला भरीव निधी प्रदान करावा अशी आग्रही मागणीही यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली. यावर मंत्री शिंदे यांनी याच महिन्याच्या अखेरीस प्रशासकीय इमारतीसाठी निधीचा पहिला टप्पा मंजूर करुन वितरित केला जाईल असे सांगितले. त्यामुळे प्रशासकीय इमारतीचे बांधकामास यावर्षी सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सातारकरांना वरदान ठरलेल्या, जिव्हाळय़ाचा कास धरण उंची वाढवण्याच्या प्रकल्पाला राज्यशासनाकडून मंजूर झालेला निधीची रक्कम तातडीने मिळावी, तसेच कास बंदिस्त पाईपलाईनव्दारे पाणी आणण्याचा प्रकल्प अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे त्यास मंजूरी आणि निधी मिळावा अशी मागणी केली असता, यावर्षापासून दरवर्षी टप्याटप्याने निधी देण्याचे मान्य केले आहे.
माहुली येथे कोरोना काळात अंत्यसंस्कार होण्यास वेळ लागत होता, त्यासाठी याठिकाणी विद्युत दाहिनी बसवण्याकामीचा प्रस्ताव मंत्री एकनाथ शिंदे यांना प्रस्ताव दिला असता, त्यास त्यांनी तातडीने मंजूरी दिली आहे. त्यामुळे लवकरच याठिकाणी विद्युत दाहिनी बसवली जाणार आहे.
राजवाडा येथील जुन्या नगरपालिका कार्यालयामध्ये आर्ट गॅलरीचे प्रस्तावास ना.एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिली आहे.
सातारा शहरासाठी मंजूर दुसरी सुधारित विकास योजना सुधारित करणे तसेच सातारा नगरपरिषदेच्या हद्दवाढीत नव्याने समाविष्ट झालेल्या क्षेत्रासाठी विकास योजना, जीआयएस प्रणालीव्दारे करण्याकरीता येणारा खर्च शासनाने करण्याबाबत प्रस्तावित केलेले आहे. हा खर्च शासनाने करणे गरजेचे आहे व तो खर्च शासनाने करावा, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली. याबाबतही मंत्री शिंदे यांनी यावेळी मंजूरी दिल्याने, याकामाचा संपूर्ण खर्च राज्यशासन करणार आहे. सातारा शहराची हद्दवाढ झाल्याने, उपलब्ध कर्मचारी यांच्यामार्फत नागरी सुविधा पुरवणे अशक्य होत असल्याने नगरपरिषदेमध्ये नवीन पदनिर्मिती करुन, जागा भरण्याच्या प्रस्तावासही मंत्री शिंदे यांनी मंजूरी दिली आहे.









