प्रतिनिधी / कोल्हापूर
कागल तालुक्यातील सेनापती कापशी परिसरात आलेला टस्कर रात्री आपल्या अधिवासात गेला. या टस्कर हत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी वन प्रादेशिक विभागाचे वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी शुक्रवारी केली. व विभागाकडून या भागातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. शेतकऱयांना वन विभागाकडून तातडीने नुकसान भरपाई दिली जाईल, असे वन विभागाच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले.
सेनापती कापशी परिसरात गुरूवारी हत्ती दाखल झाला होता. वन विभागाच्या पथकाला रात्री त्याला अरळगुंडी परिसरातून अधिवासात पाठवण्यात यश आले. शुक्रवारी प्रादेशिक वनसंरक्षक डॉ. बेन, उपवनसंरक्षक आर. आर. काळे यांनी हत्तीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या भागाला भेट दिली. तसेच वन अधिकारी, कर्मचाऱयांना हत्तीप्रवण भागातील पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या. तसेच ज्या शेतकऱयांच्या पिकांचे हत्तीमुळे नुकसान झाले आहे. अशांनी तात्काळ स्थानिक वन कर्मचाऱयांकडे संपर्क साधावा, असे आवाहन करवीरचे वनाधिकारी सुधीर सोनवले यांनी केले आहे.
वन विभागाचे स्वतंत्र गस्ती पथक राहणार
सेनापती कापशीमध्ये नुकसानग्रस्त भागात गस्तीसाठी वन विभागाने स्वतंत्र गस्ती पथक तैनात केले आहे. त्यामुळे या भागात पुन्हा हत्तीचे दर्शन झाल्यास ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. वन्य प्राणी नागरी वस्तीत आल्यास काय करावे, यासंदर्भात परिसरात जनजागृती करण्यात येत आहे. तरी वन्य प्राणी आढळल्यास लोकांनी गर्दी करू नये, असे आवाहन वनाधिकारी सोनवले यांनी केले आहे.