मनपाने विचारले नगरविकास खात्याला स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेळगाव
सेवा बजावताना मृत्यू झाल्यास मनपा कर्मचाऱयांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. मात्र हंगामी तत्वावर असलेल्या महापालिका स्वच्छता कामगारांनी नुकसान भरपाई देण्याबाबत कोणतीच सूचना नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. परिणामी कोरोनाची लागन झालेल्या स्वच्छता कामगारांना नुकसान भरपाई देण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे याबाबतचे स्पष्टीकरण नगर विकास खात्याकडे विचारण्यात आले आहे.
सेवा बजावताना कोरोना विषाणुची लागण होऊन मृत्यू झाल्यास महापालिकेच्या कर्मचाऱयांना 30 लाख रूपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. सदर निधी राज्य शासन देणार आहे. पण महापालिकेत विविध विभागात कंत्राट पद्धतीने कामगार घेण्यात आले आहेत. तसेच स्वच्छता कामगार म्हणून शेकडो कामगार कार्यरत आहेत. नगरविकास खात्याने दिलेल्या आदेशात हंगामी तत्वावर महापालिकेत काम करणाऱया कामगारांसह स्वच्छता कामगारांच्या नुकसान भरपाईबाबत कोणतीच सूचना केली नाही. केवळ महापालिका कर्मचारी व कायमस्वरूपी स्वच्छता कामगारांना 30 लाख रूपये नुकसान भरपाई देण्याची सूचना केली आहे. पण बेळगाव महापालिकेत सध्या 1100 स्वच्छता कामगार कंत्राट पद्धतीने कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई कशी द्यायची असा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. महापालिकेत सेवा बजावणाऱया कायमस्वरूपी स्वच्छता कामगारासह हंगामी तत्वावर काम करणाऱया स्वच्छता कामगार महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे हंगामी तत्वावर काम करणाऱया कामगारांना नुकसान भरपाई देण्याबाबतचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने बजावलेल्या आदेशात हंगामी कामगारांच्या नुकसान भरपाई बाबत काहीच नमुद केले नाही. त्यामुळे याबाबतचे स्पष्टीकरण नगरविकास खात्याला विचारण्यात आले आहे. स्वच्छता करणाऱया कामगारांना घरोघरी तसेच गल्लो गल्लीत कचरा घेण्यासाठी जावे लागते. त्यामुळे कोरोनाची लागन होण्याचा धोका अधिक आहे. त्याकरीता हंगामी तत्वावर काम करणाऱया स्वच्छता कामगारांच्या नुकसान भरपाई देण्यासाठी तरतूद करणे गरजेचे आहे.









