सांगुळवाडीतील प्रकारः कोरोना बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींची नाराजी
वार्ताहर / वैभववाडी:
वैभववाडी तालुक्मयात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना कोविड विभागातील ढिम्म कारभाराचा फटका सांगुळवाडी येथील संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या संशयित रुग्णांना बसत आहे. तालुक्मयातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब घेतल्यानंतर तब्बल चार दिवस या व्यक्तींना कोरोना रिपोर्टची प्रतिक्षा करावी लागली आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना नाहक मनस्ताप देणाऱया संबधितांवर कारवाई करावी, अशी मागणी संबंधित व्यक्तींच्या नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, संबंधित कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचाराअंती बरा होऊन घरी परतला. तरी त्याच्या संपर्कातील व्यक्तींना अजूनही त्यांच्या रिपोर्टची प्रतिक्षा आहे.
करुळ येथील एकाच घरातील चार व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोविड कक्षात दाखल करण्यात आले. खबरदारी म्हणून 25 ऑगस्ट रोजी त्यांच्या संपर्कातील सहा व्यक्तींना स्वॅबसाठी आरोग्य प्रशासनाने सांगुळवाडी येथील कोविड कक्षात दाखल केले. ‘तुम्हाला 24 तासात घरी सोडले जाईल’, असे तेथील आरोग्य प्रशासनाच्या कर्मचाऱयांनी त्यांना सांगितले. परंतु स्वॅब घेऊन चार दिवस झाले तरी त्यांना स्वॅबचा रिपोर्ट मिळालेला नाही. आरोग्य प्रशासनाच्या या कारभाराबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे इतरही गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचेही नमुने घेतले जात आहेत. मात्र त्यांचेही रिपोर्ट प्रलंबित आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी आरोग्य प्रशासनाला चांगले सहकार्य केले आहे. मात्र पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना कुणाच्या तरी हलगर्जीपणामुळे कोविड कक्षात नेवून डांबून ठेवण्याचे प्रकार होत असतील, तर ते खेदजनक आहे. अशा कामचुकार पद्धतीमुळे भविष्यात कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना स्वॅबसाठी नेणे आरोग्य प्रशासनाला कठीण काम होणार आहे.
कामचुकार कर्मचाऱयांवर कारवाई करा
राज्य शासनाकडून कोरोना रिपोर्ट हे 12 तासात मिळतात, असे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात रिपोर्टसाठी चार दिवस प्रतिक्षा करावी लागत आहे. हे प्रकार थांबवून जिल्हा प्रशासनाने कारभारात सुधारणा करावी. तसेच कोरोना रिपोर्ट देण्याबाबत दिरंगाई करणाऱया संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱयावर जिल्हाधिकाऱयांनी कारवाई करावी, अशी मागणी संबंधितांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे..









