वृत्तसंस्था / स्टॉकहोम
स्वीडनच्या एका हायस्कूलमध्ये चाकूने वार करत दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी 18 वर्षीय विद्यार्थ्याला अटक केली आहे. आरोपीकडे चाकू, कुऱहाड आणि हातोडा होता, असे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्याने कुठल्या उद्देशाने हा हल्ला केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
स्वीडनच्या माल्मो शहरात ही घटना घडली आहे. राजधानी स्टॉकहोमपासून माल्मो शहर सुमारे 615 किलोमीटर अंतरावर आहे. माल्मो लातिनस्कोला स्कूलमध्ये हा हल्ला झाला. या हल्ल्यात दोन महिलांना जीव गमवावा लागला आहे. दोन्ही महिला शाळेच्या कर्मचारी होत्या असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या हल्ल्यादरम्यान शाळेत 50 जण उपस्थित होते, यातील अनेक जण जखमी झाले आहेत. शाळेचे मुख्याध्यापक प्रेड्रिक हेमेंसजो यांनी या घटनेला भयावह संबोधिले आहे. हल्ल्याची माहिती मिळाल्यावर तेथे त्वरित धाव घेतली, शाळेतून लोकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. आरोपीने दोन जणांवर हल्ला केला. हल्ल्यामागील कारणांसंबंधी अद्याप माहिती मिळाली नसल्याचे एका पोलीस अधिकाऱयाने सांगितले आहे.
जानेवारी महिन्यात स्वीडनच्या क्रिस्टियनस्टेड शहराच्या शाळेत हल्ला झाला होता. या हल्ल्यात एक विद्यार्थी आणि एक शिक्षक जखमी झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी 16 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले होते. मागील वर्षी ऑगस्टमध्ये एस्लोव्ह शहरात एका विद्यार्थ्याने 45 वर्षीय कर्मचाऱयावर चाकूने हल्ला केला होता. तर ऑक्टोबर 2015 मध्ये ट्रोलहट्टन येथील एका शाळेत 3 जण मारले गेले होते.









