3500 जणांना नोटीस : कर चोरी करणाऱयांवर बसणार चाप
स्वित्झर्लंडच्या प्राप्तिकर अधिकाऱयांनी करचुकवेगिरी करून फरार अशा व्यक्तिंच्या बँक खात्याची माहिती भारताच्या प्राप्तिकर अधिकाऱयांना दिली आहे. भारत आणि स्वित्झर्लंडच्या प्राप्तिकर अधिकाऱयांनी अशा काही ट्रस्टची माहिती मिळविली आहे, ज्याच्या माध्यमातून अवैधरित्या पैसे लपविले आहेत. अशा सर्व संस्था आणि व्यक्तींमिळून 3500 जणांना स्वित्झर्लंडच्या प्राप्तिकर विभागाने नोटीस जारी केली आहे.
स्वित्झर्लंडच्या सरकारी राजपत्रात गेल्या महिन्यात प्रसारीत केलेल्या नोटिशीनुसार, व्यापारी व्यक्ती, ट्रस्ट आणि कंपन्यांना आपल्या बँक खात्यांची माहिती भारताला सांगण्याबद्दल काही आक्षेप असेल तर नोंदविण्यात यावा असे म्हटले होते. केमेन, पनामा आणि ब्रिटीश वर्जिन आयलँड्स सारख्या ठिकाणी बनविण्यात आलेल्या ट्रस्टला सामान्यतः कर चुकविण्याचे स्त्रोत मानले जाते.
नोटीस जारी करण्यात आलेल्यांमध्ये सात जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये व्यापारी अतूल पुंज, गौतम खेतान, सतीश कालरा, विनोद कुमार खन्ना, दुल्लाभाई कुंवरजी वाघेला, रीवाबेन दुल्लाभाई कुंवरजी वाघेला आणि बळवंत कुमार दुल्लाभाई वाघेला यांचा समावेश आहे. काही प्रकरणांमधील नोटिसांमध्ये ज्या व्यक्तिंची नावे आहेत, ते अगोदरच मृत आहेत. मात्र, त्यांच्या वारसांना या नोटिसांना उत्तर द्यावे लागणार आहे.
भारत-स्विझर्लंड यांच्यात करार
कर चोरी प्रकरणांमुळे जागतिक स्तरावर करण्यात आलेल्या करारानंतर गोपनीय माहितीची देवाणघेवाण सोपी झाली आहे. बँक खातेदारांची माहिती सामायिक करण्यावरून भारत सरकारबरोबर स्विझर्लंडने करार केला आहे. त्याचबरोबर इतरही काही देशांची अशाप्रकारचा करार करण्यात आला आहे.
अवैधरित्या पैसा लपविल्याचा संशय
आयलँडच्या ज्या ट्रस्टना नोटीस बजावली आहे यामध्ये द पी देवी चिल्ड्रन्स ट्रस्ट, द पी देवी ट्रस्ट, द दिनोद ट्रस्ट आणि द अग्रवाल पॅमिली ट्रस्ट यांचा समावेश आहे. तर आयलँडमधील देवी लिमिटेड तसेच भारतातील अधी ऐंटरप्रायजेस प्रा. लि.सह इतर कंपन्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून काही नेत्यांनी आपला पैसा अवैधरित्या रियल इस्टेट, दागिने, आर्थिक सेवांसारख्या क्षेत्रात लपविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.








