ऑनलाईन टीम / पुणे :
मंडईजवळील रामेश्वर चौकातील श्री अक्ककोट स्वामी महाराज संस्थानच्या श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षी भक्तांच्या गर्दीत उत्साहात होणारी पालखी प्रदक्षिणा रद्द करुन पाळणा व इतर धार्मिक कार्यक्रम मठातच साधेपणाने पार पडले. प्रकट दिनानिमित्त फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती.
मठात पहाटे ३ वाजता कोरोना मुक्तीसाठी लघुरुद्र करण्यात आला. त्यानंतर पहाटे ५ वाजता प्रकट दिनाचे कीर्तन ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर यांनी केले. सकाळी ११.३० वाजता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून अन्नदान करण्यात आले. दुपारी ४ वाजता श्री स्वामी समर्थांची आरती करण्यात आली. सायंकाळी पादुका प्रदक्षिणा मठातच संपन्न झाली. यावेळी संस्थानचे गजानन जेधे, संदीप होनराव, रवींद्र शेडगे, विक्रम आगाशे, श्रीराम पुरंदरे आदी उपस्थित होते.
कमलेश कामठे म्हणाले, श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त रामेश्वर चौकातील श्री अक्ककोट स्वामी महाराज संस्थानच्या श्री स्वामी समर्थ मठात दरवर्षी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा भक्तांविना साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आला. मात्र, मठामध्ये ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम झाले.