प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील नाल्यांमध्ये कचरा साचल्याने सांडपाण्याचा निचरा होणे मुश्कील झाले आहे. ठिकठिकाणी गवत, झाडेझुडुपे उगवली असल्याने पावसाळय़ात सांडपाणी साचून दुर्गंधी पसरण्याचा धोका आहे. पावसामुळे पुराचे पाणी घरांमध्ये शिरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाला स्वच्छतेची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेऊन नानावाडी, टिळकवाडी परिसरात नाला स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे.
टिळकवाडी भागातून वाहणाऱया नाल्याद्वारे शास्त्रीनगर परिसरात नाल्यामध्ये कचरा साचत आहे. परिणामी पावसाळय़ात कचरा साचून नाला काठावरील घरांमध्ये पाणी शिरत आहे. महापालिकेच्यावतीने स्वच्छता कर्मचाऱयांकरवी नालासफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. नालासफाईला मागील आठवडय़ापासून प्रारंभ करण्यात आला असून शांतीनगर आणि गजानन महाराजनगर, शिवाजी कॉलनी अशा परिसरातील नाला स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. काँग्रेस रोड, नानावाडी, गोवावेस आदी परिसरातील नालासफाईच्या कामास प्रारंभ करण्यात येणार आहे. कोनवाळ गल्ली, शिवाजी उद्यान, कपिलेश्वर कॉलनी, शास्त्राrनगर, हनुमाननगर अशा विविध परिसरातील नाला सफाईचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी दिली. महापालिकेच्यावतीने स्वामी विवेकानंदनगर परिसरात स्वच्छता कर्मचाऱयांकरवी आणि महापालिकेच्या जेसीबीद्वारे स्वच्छता केली जात आहे. टिळकवाडी परिसरामधून दोन नाले वाहत असून सध्या एका नाल्याच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. स्वामी विवेकानंदनगर, महात्मा फुले कॉलनी अशा विविध परिसरात कचरा काढण्याचे काम सुरू आहे.









