वार्ताहर / राशिवडे
येथील जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी व राष्ट्रीय काँग्रेसचे जेष्ठ नेते रघुनाथ सिताराम गुळवणी (वय ९०) यांचे शुक्रवारी सकाळी वृद्धापकाळाने राशिवडे येथील राहते घरी निधन झाले.ते राधानगरी पंचायत समितीचे तीन वर्षे उपसभापती व सलग ११ वर्षे सदस्य होते.गुळवणी काका या टोपण नावाने सर्वांना ते परिचित होते.त्यांच्यावर राशिवडे येथील स्मशानभूमीत दुपारी दोन वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी राधानगरी तहसील कार्यालय व राधानगरी पोलिस ठाणे यांच्यावतीने शासकीय मानवंदना देण्यात आली.राधानगरीचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद सुर्वे यांनी पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण केले.त्यापूर्वी भोगावती सहकारी साखर कारखान्याचे सुरक्षारक्षक व माजी सैनिक चंद्रहार पाटील,सरपंच कृष्णात पोवार यांनी श्रध्दांजली वाहिली.यावेळी भोगावतीचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर व स्वातंत्र्य सेनानी लहुजी कांबळे यांनी पार्थिवास पुष्पहार अर्पण करून त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
अंत्ययात्रेत राशिवडे उपसरपंच सम्राटसिंह पाटील,माजी उपसरपंच डॉ जयसिंग पाटील,राशिवडे महसूल मंडल अधिकारी देवीदास तारडे,गावकामगार तलाठी सुनिल खेडकर,पोलीस पाटील उत्तम पाटील व बाळासो गूरव (चाफोडी),श्रीलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन अमर पाटील,मानवंदना साठी उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी एस.ए बामणे,एस.बी.पारखे, बी.एन.पाटील,आर ए.केणे,जी.ए.पाटील,एस.एम.पाटील आदी मान्यवरासह ग्रा पं,विविध सहकारी संस्था,व्यापारी संघटना पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भोगावती कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय काँग्रेसचे नेते कै दादासाहेब पाटील कौलवकर व कै बाळासाहेब पाटील कौलवकर यांचे ते विश्वासू व निष्ठावंत सहकारी होते.
भोगावती साखर कारखान्याचे कर्मचारी दत्तात्रय गुळवणी यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात मुलगा,चार मुली,पुतणे,सुना, नातवंडे,परतवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी सकाळी ९ वाजता राशिवडे ता राधानगरी येथे होणार आहे.









