संताजी धनाजी यांना हाताशी घेऊन स्वराज्य राखणाऱ्या मराठ्यांच्या सर्वश्रेष्ठ साम्राज्ञीची गोष्ट: स्वराज्य सौदामिनी ताराराणी
सचिन ठाणेकर / सांगली
जिने खोदली औरंगजेबाची कबर अशा रणरागिणीची, ताराराणीची गाथा; ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेतून सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ऐन दिवाळीत सांगलीकरांमथ्ये या मालिकेबद्दल प्रचंड उत्सुकता वाढली आहे. डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स यांनी मालिकेची निर्मिती केली आहे. ‘जीवात- जीव आणि श्वासात- श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहिल आणि त्या औरंगजेबाची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’ हे ताराराणींचे जाज्वल्य निष्ठा आणि करारीपणा व्यक्त करणारे भाष्य आहे. ज्याचे कौतुक होत आहे. मालिकेतील मध्यवर्ती ताराराणीची भूमिका कोण साकारणार ? यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ताराराणीच्या भूमिकेसाठी अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिची निवड करण्यात आली.
ताराराणींनी स्वराज्याची धुरा समर्थपणे सांभाळली आणि स्वराज्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेला. ताराबाईंच्या नेतृत्वाखाली स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करण्याची अवघड कामगिरी शिरावर घेऊन ती फत्ते केली. मराठ्यांच्या दोन शूर सेनानींनी, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी. एक वाघ तर दुसरा सिंह. चारही दिशांना विखुरलेले अवघे मराठी लष्कर या दोन सेनानींच्या नेतृत्वाखाली आणि ताराबाईंच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कमी वेळेत एकवटले आणि मराठी साम्राज्यात दैदीप्यमान इतिहास घडला.
संताजी आणि धनाजी यांची मोगल सैन्यावर इतकी दहशत होती की, मोगली घोडे मराठी मुलखाचे पाणी प्यायला बिचकू लागले. तुम्हांला पाण्यात काय संताजी-धनाजी दिसतात का..? असे मोगल सेनापती आपल्या घोड्यांना विचारू लागले. ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत या दोन धुरंधर सेनानींची गोष्टही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अमित देशमुख आणि रोहित देशमुख हे दोघे संताजी आणि धनाजी यांची भूमिका साकारत आहेत. यासाठी त्यांच्या घोडेस्वारी, दांडपट्टा, तलवारबाजी अशा मर्दानी खेळांच्या तालमी सुरू आहेत. आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी हे दोन्ही कलाकार अतिशय कसून मेहनत घेत आहेत. स्वराज्य सौदामिनी ताराराणी हे स्वराज्याच्या इतिहासातील देदीप्यमान पर्व १५ नोव्हेंबरपासून, सोम.-शनि., संध्या ७:३० वा. सोनी मराठीवर सुरू होणार आहे.