सांस्कृतिक प्रतिनिधी/ फोंडा
फोंडा पत्रकार संघ आयोजित 33 वे स्वरसाम्राज्ञी गिरिजाताई केळेकर संमेलनाला फर्मागुडी येथील गोपाळ गणपती सभागृहात शानदार संगीत मैफीलीसह थाटात प्रारंभ झाला.
या संमेलनप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी तथा वक्ते पत्रकार राजू नायक, बांदोडय़ाचे सरपंच राजेश नाईक, सत्कारमुर्ती पं. तुळशीदास नावेलकर, जनार्दन वेर्लेकर, संमेलनाध्यक्ष जयंत मिरिंगकर, आयोजन समितीचे अध्यक्ष संजय घाटे व स्वागत समितीचे अध्यक्ष रघुनाथ फडके उपस्थित होते.
मान्यवरांच्याहस्ते दिपप्रज्ज्वलनाने तसेच स्वरसाम्राज्ञी गिरिजाताई केळेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संमेलनाचे उद्घाटन झाले. सरपंच राजेश नाईक आपल्या भाषणात म्हणाले की हिंदुस्थानी शास्त्रिय संगीताकडे होणारे दुर्लक्ष इथल्या संस्कृतीसाठी घातक ठरू नये, यासाठी संस्काराचे बीज रोपण तरूण पिढीमध्ये होणे गरजेचे आहे. संगीत आनंददायी आहे त्यातून मनाला शांती मिळते.
या संमेलनात ज्येष्ठ कलाप्रेमी नाटय़कर्मी आणि संगीत समिक्षक जनार्दन वेर्लेकर याना पं. जितेंद्र अभिषेकीचे शिष्योत्तम रघुनाथ फडके यानी आपले गुरू पं. अभिषेकी यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केलेला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्व. लक्ष्मीकांत घाटे यांच्या कुटूंबियानी आपले वडील लक्ष्मीकांत घाटे यांच्या स्मरणार्थ पुरस्कार ज्यामध्ये शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रू. 10000 देऊन पं. तुळशीदास नावेलकर यांचा सत्कार केला. या संमेलनामध्ये गौरांगी मिरिंगकर यांनी इशस्तवन सादर केले. त्यांना संवादिनीवर दामोदर च्यारी व तबल्यावर गजेश तारी यांनी साथसंगत केली. गौरांगी मिरिंगकर यानाही स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या संमेलनाचे औचित्य साधून ‘स्वरांजली’ या स्मरणिकेचे अनावरण सरपंच राजेश नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना जनार्दन वेर्लेकर यांनी गोमंतकीय कलाकार ज्यानी संगीताकडे मोठे केले त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पत्रकार संगीत संमेलन हे एक दर्जेदार संगीत संमेलन असून आनंदप्राप्तीचे साधन म्हणून संगीताकडे पहाणे इष्ट असल्याचे ते म्हणाले संमेलन समितीप्रती त्यानी आपल्या भावना व्यक्त केल्या.
रघुनाथ फडके यांनी स्वागत केले. जयंत मिरिंगकर यांनी प्रास्ताविक केले यावेळी आयोजन समितीच अध्यक्ष संजय घाटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दुर्गाकुमार नावती यानी सुत्रसंचालन केले. तर पत्रकार नरेद्र तारी यांनी आभार मानले. त्यानंतर पुण्यातील अग्रणी गायिका यशस्वी सरपोतदार यांच्या गायनाच्या मैफल झाली. त्याना तबल्यावर पं. तुळशीदास नावेलकर, संवादिनीवर दत्तराज सुर्लकर तर तानपुऱयावर मयुरी लेले यानी साथसंगत केली. आज सायंकाळी 5 वा. बाळकृष्ण मराठे यांचे गायन होणर असून 6 वा. यशवंत वैष्णव यांचा तबला एकलवादन व रात्री 8 वा. शेखर कुंभोजकर व प्रचला आमोणकर यांचे नाटय़गीत गायन होईल









