संकटे एकटी येत नाहीत, कधीकधी ती गटागटाने आणि हातात हात घालून येतात. सध्या देशाची अशीच अवस्था झाली आहे. कोविड-19 च्या महासंकटाने जगाला वेढले, तसे त्याने आपल्याभोवतीही फास घट्ट आवळला. या संकटाशी सामना करत असतानाच चीन, नेपाळ आणि पाकिस्तानच्या कुरबुरीने सीमा अशांत झाल्या. तणाव वाढला. आव्हानांपाठोपाठ आव्हाने झेलत असताना दीर्घकाळाच्या टाळेबंदीनंतर सरकार आता एक नवी सुरुवात करीत आहे. रुतलेला अर्थव्यवस्थेचा गाडा बाहेर खेचण्याच्या दृष्टीने हे अत्यंत आवश्यक आहे. टाळेबंदी अंशत: शिथिल करत आपण अनलॉक-1 च्या टप्प्यात आहोत. यानंतर खऱया अर्थाने दुसरा महत्त्वाचा टप्पा अनलॉक-2 चा असणार आहे. तो एक जुलैपासून सुरु होत आहे. समूह संसर्गाचा मोठा धोकाही याच काळात असणार आहे. म्हणजेच सरकारला देशाच्या सीमेवरील संकटे, डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, कोरोनाशी सुरु असलेला सामना, येऊ घातलेला संभाव्य समूह संसर्गाचा धोका या सर्व पातळय़ांवर एकाचवेळी लढावे लागणार आहे. याचाच अर्थ देशात सगळीकडून संकटाचे अंधकारमय मळभ दाटून आले आहे. पण हीच ती वेळ आहे जेव्हा चोहोबाजूंनी संकटाने वेढलेले असते, अंधार दाटून आलेला असतो, सर्वकाही संपले आहे असे वाटत असते अशा वेळी नव्या उमेदीने निर्धारपूर्वक सुरुवात करण्याची हीच योग्य वेळ असते. अनलॉक-2 च्या निमित्ताने एक जुलैपासून आपण ती सुरुवात करत आहोत. तथापि, प्राप्त परिस्थितीचा विचार करता सर्व व्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी यापुढे आपल्याला फार मोठय़ा आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे, हे मात्र निश्चित. कोविड-19 ची सद्यस्थिती आणि अनलॉक-2 च्या नियोजनासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेले दोन दिवस विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. डॉक्टर्स, कोरोना योद्धे, विविध राज्यांची सरकारे आणि प्रशासन यांच्या सामुदायिक प्रयत्नांमुळे कोरोनाचा फैलाव आणि समूह संसर्ग रोखण्यात सध्यातरी यश आल्याची नोंद पंतप्रधानांनी यावेळी घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी देखील राज्यातील तळागाळातील वस्तुस्थिती थोडक्यात मांडली. अनलॉक 1, 2 च्या तयारीबाबत आपले विचार व्यक्त केले. टाळेबंदीचा फार मोठा फटका जसा छोटय़ा मोठय़ा उद्योगधंद्यांना बसला तसा तो असंघटित रोजदांरीलादेखील बसला. याची फार मोठी किंमत अर्थव्यवस्थेला चुकवावी लागली. स्थलांतरितामुळे निर्माण झालेली मजुरांची टंचाई आणि टाळेबंदी काळातील मोठय़ा नुकसानीनंतर उभे करावे लागणारे खेळते भांडवल, सरकारकडून होणाऱया अर्थसहाय्याची योग्य अंमलबजावणी यासारख्या आव्हानांना उद्योगधंद्यांना सामोरे जावे लागेल. देश अडचणीच्या काळातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. टाळेबंदीतील बंधने अंशत: शिथिल करणे हा या प्रक्रियेचा एक भाग आहे. अशा काळात सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याची गरज असताना काही अज्ञानी किंवा कुटनीतीज्ञ तसेच झारीतील शुक्राचार्य पुन्हा लॉकडाऊन लादणार, अशी अफवा पसरवत आहेत. अफवा या विषाणू, जीवाणूसारख्या असतात. याची वेगाने लागण होते. सीमेपलीकडील परकीयांशी लढणे एकवेळ सोपे परंतु देशात गोंधळ, संभ्रम निर्माण करणाऱया अफवेखोरांशी लढण्याचे फार मोठे आव्हान सर्वांसमोर आहे. अनलॉक-2 ला समोरे जाण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला संभाव्य लॉकडाऊनबाबत उठवलेल्या अफवांशी सामना करण्याची गरज आहे, अशी खंत पंतप्रधानांनी बोलून दाखवली. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधानांना या अफवेची दखल घ्यावी लागली. त्यांना याचा प्राधान्याने उल्लेख करावा लागला. यातून त्यांनी समाजाची विकृत मानसिकता दाखवून दिली. यापुढे लॉकडाऊनचा पाचवा व सहावा टप्पा असणार नाही, हे पंतप्रधानांनी यावेळी निक्षून सांगितले, हे एका दृष्टीने बरे झाले. आर्थिक व्यवहारांना गती देण्यासाठी लॉकडाऊन शिथिल करणे आवश्यकच आहे. पण याबरोबरच नजीकच्या काळात काही कठीण आव्हानांना आपल्याला सामोरे जावे लागेल हे विसरुन चालणार नाही. थोडक्यात, एका बाजूला आरोग्य आणि दुसऱया बाजूला आर्थिक बाजू सक्षम करण्याची तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अनलॉक 1 आणि 2 च्या काळात मॉल्स, धार्मिक स्थळे, उद्योग, बाजार, दुकाने मोठय़ा प्रमाणात सुरु होतील. आजही गर्दीच्या ठिकाणी बहुतांशवेळा निकष पाळले जात नाहीत. लोकांना गांभीर्य नाही. मास्कच्या वापराबाबत बेफिकिरी दाखवली जाते. सामाजिक अंतर पाळले जात नाही. भारताच्या 130 कोटींच्या अवाढव्य लोकसंख्येचा विचार केल्यास अन्य देशांच्या तुलनेने आपल्याकडे कोरोना चाचण्या घेण्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. प्रतिदिनी एक लाख लोकसंख्येमागे एक चाचणी असे प्रमाण असून स्पेनमध्ये ते 82, अमेरिकेत 52, इंग्लंडमध्ये 26 असे आहे. सारांश, कोरोनाची लक्षणे नसलेली किंवा प्राथमिक लक्षणे असणाऱयांची संख्या अधिक असू शकते. अनलॉकच्या दुसऱया टप्प्यात अशा लोकांपासून संसर्गाचा धोका अधिक पोहोचू शकतो, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. याचा विचार करुन सरकारने अलीकडे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यावर रामबाण उपाय एकच आहे तो म्हणजे सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगबाबत मोठय़ा प्रमाणात जागृती. समाधानाची बाब म्हणजे कोरोना चाचणीनंतर रुग्ण पॉझिटिव्ह असण्याची टक्केवारी आपल्याकडे कमी आहे. म्हणूनच सरकारने टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथिल करण्याचा निर्णय घेतला असावा. तथापि दिल्ली, तामिळनाडू, मुंबई याठिकाणी मात्र रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण जास्त आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यास प्रारंभ झाल्यानंतरच बहुतांशी देशांनी टाळेबंदी शिथिल केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनुसार सतत चौदा दिवस दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सरासरी पाच टक्क्यापेक्षा खाली असायला हवी. आपल्याकडे ती आठ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ही बाब गंभीर आहे. सरकारने जनतेच्या भरवशावरच अनलॉक-2 चा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारपेक्षा सर्वाधिक जबाबदारी जनतेच्या स्वयंशिस्तीवर राहील.
Previous Articleचला, योग करुया… निरोगी राहूया
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








