सेलिब्रिटी कलाकारांच्या मैत्रीचे किस्से आपण अनेकदा ऐकतो. सिनेमा, मालिका, नाटक या क्षेत्रात सहकलाकार म्हणून एकत्र येतात आणि त्यांच्यात छान मैत्री होते असे खूप कलाकार इंडस्ट्रीमध्ये आहेत. कलाकारांची मैत्री हा चाहत्यांमध्ये उत्सुकतेचा विषय असतो. गंमत म्हणजे, एकमेकांचे मित्र किंवा मैत्रीण असलेले कलाकार एकमेकांना वेगळ्याच नावाने हाक मारत असतात. या टोपणनावाचे किस्सेही इंडस्ट्रीत रंगत असतात. असाच एक किस्सा अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री गौरी नलावडे यांच्या मैत्रीचा…

स्वप्नील आणि गौरी यांनी एकत्र प्रेंडस या सिनेमात काम केले आहे. स्वप्नील सांगतो, आम्ही प्रेंडस या सिनेमाच्या निमित्ताने भेटलो. दरम्यान आम्ही खूप चांगले मित्रमैत्रीण झालो. सुरूवातीला मी तिला गौरी अशीच हाक मारायचो आणि ती मला स्वप्नील म्हणायची. गौरी इतकी नाजूक आहे ना की तिच्या बोलण्यात, वावरण्यात तो नाजूकपणा दिसतो. पण माणूस कितीही नाजूक असला तरी तो शिंक आणि आळस देणे या क्रिया नाजूकपणे करत नाही असा माझा एक समज होता. पण गौरीचं तसं नाहीय. तिला कितीही मोठा आळस द्यायचा झाला तरी ती हात न पसरवता अगदी खांद्यापर्यंत हात नेत आळस देते. गौरीचं हे असं मोठा आळसदेखील छोटाशा रूपात देण्याची पद्धत मी शूटिंगवेळी पहायचो. तेव्हापासून मी गौरीला मोठा आळस अशीच हाक मारतो.
गौरीनेही मग स्वप्नीलसोबतच्या मैत्रीला आणि त्यांच्यातील वेगळ्या नावांचा किस्सा शेअर केला. गौरी म्हणाली, स्वप्नील खूपच गोरा आहे. आणि गोराच नव्हे तर त्याच्या गालावर गुलाबी झाक आहे. आम्ही मैत्रीने खूप जवळ आलो तेव्हा मला वाटलं की स्वप्नीललाही मी काहीतरी वेगळ्या नावाने बोलवलं पाहिजे. मग मला सुचलं आणि मी त्याला तेव्हापासून गोरा पिंक असं म्हणते.
स्वप्नील आणि गौरी जेव्हा भेटतात, चॅटिंग करतात तेव्हा ते याच नावांचा वापर करत असतात.









