प्रतिनिधी/ बेळगाव
तुमचा व्यवसाय किंवा उद्योग हा तुमच्या आरोग्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता स्वतःची काळजी घ्या, असा महत्त्वाचा सल्ला लता कित्तूर यांनी महिला उद्योजकांना दिला.
आविष्कार उद्यमशील संस्थेचा 22 वा वर्धापन दिन बुधवारी सायंकाळी वरेरकर नाटय़ संघाच्या सभागृहात पार पडला. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर संस्थाध्यक्ष मनीषा बदानी होत्या.
त्या म्हणाल्या, तुम्ही स्वतःकडे लक्ष देतानाच स्वतःला वेळ द्या आणि छंद जोपासा. त्यातून आनंद मिळतो व ताण कमी होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘च’, ची’ भाषा कधीही वापरु नका. मला किंवा तुला केले‘च’ पाहिजे, म्हटले की दबाव वाटतो. तो सोडला तर आपण मैत्र निर्माण करु शकतो. त्याचबरोबर संगणकाशी मैत्री करा, जेणेकरून तुम्ही अधिक स्वावलंबी व्हाल व अनेक गोष्टी सुकर होतील व आत्मविश्वास वाढेल, असेही लता कित्तूर यांनी नमूद केले.
यानिमित्ताने उपवासाची थाळी तयार करणे ही स्पर्धा घेण्यात आली. एकूण तीन पदार्थ तयार करावयाचे होते. यामध्ये अमृत तळवलकर यांनी प्रथम, शारदा कल्पवृक्ष यांनी द्वितीय तर स्मिता गोखले यांनी तृतीय क्रमांक मिळविला. मोनाली परब यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. परीक्षक म्हणून मेधा मराठे व मेधा पाटील यांनी काम पाहिले. त्यानंतर दिलेल्या विषयावर एक मिनीट बोलावयाचे होते. त्यामध्ये मी प्रथम पतंग उडविला तेंव्हा, आई रिटायर होतेय, मी बेळगावची सर्वेसर्वा झाले तर, मुलांवर कोणते संस्कार करावेत असे वेगवेगळे विषय देण्यात आले. याची संकल्पना रोहिणी गोगटे यांची होती. यामध्ये ग्रुप क्रमांक दोन व प्रज्ञा सरदेशपांडे यांनी बक्षिसे मिळविली.
यानंतर शीतल गोगले व संगीता परिहार यांचा नृत्याविष्कार झाला. त्याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांच्या आग्रहास्तव निहारिका पुसाळकर यांनी दोन गीते सादर केली. यानंतर महिलारत्न व कॉ. अरुणा असफअली पुरस्कार मिळाल्याबद्दल ‘तरुण भारत’च्या पत्रकार मनीषा सुभेदार यांना लता कित्तूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मनीषा बदानी यांनी स्वागत केले तर हिमांगी प्रभू यांनी अहवाल वाचन केले.
संजना सामंत यांना आविष्कार उद्योगिनी पुरस्कार
याशिवाय उषाताई गोगटे उद्योगिनी पुरस्कार सुनिता पाटणकर यांना तर आविष्कार उद्योगिनी पुरस्कार संजना सामंत यांना लता कित्तूर यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच शीतल व संगीता यांनाही भेटवस्तू देण्यात आली. सुनिता पाटणकर आपल्या भावना व्यक्त करताना 60 व्या वषी उद्योग सुरू केला तरी बेळगावकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. मैत्रिणींनी व कुटुंबीयांनी प्रोत्साहन दिले. शिवाय कामासाठी असलेल्या सहकाऱयांचा सहभागही महत्त्वाचा असून रोहिणी, बिंबा, स्वाती, मनीषा कक्केरी, वीणा तेंडोलकर याच्या सूचना उपयुक्त ठरल्याचे सांगितले. व्यावसायात दर्जा राखणे आवश्यक असेही त्यांनी नमूद केले.
जुन्या रेशमी साडय़ा विकता विकता आपण स्वतःच नव्या साडय़ांवर कशिदा करून विकण्याचे ठरविले आणि पाहता पाहता हा व्यवसाय वाढत गेला. या व्यवसायाने मला आर्थिक स्वावलंबी बनविले तसेच मला मैत्र दिले, असे नमूद केले.
अपर्णा सामंत यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.









