प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध रस्त्यांचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आला आहे. या अंतर्गत शिवबसवनगर येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण व अन्य विकासकामे राबविण्यात आली आहे. मात्र या स्मार्टरोडवर पावसाचे पाणी साचत असून, रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. परिणामी वाहनांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे हीच काय स्मार्ट सिटी असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. शहर स्मार्ट बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. प्रामुख्याने रस्त्यांचा विकास, रस्त्याच्या दुतर्फा, फुटपाथ, गटारींच्या पाईप्स आणि दुभाजक घालण्यात आले आहेत. जलवाहिन्यांसाठी वेगळे डक्ट करून अत्याधुनिक पद्धतीचे स्मार्ट रोड बनविण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात विविध रस्त्यांचा विकास करण्यात आला.
या अंतर्गत शिवबसवनगर येथील एस. जी. बाळेकुंद्री कॉलेज समोरील रस्ता स्मार्ट बनविण्यासाठी कोटय़वधीचा निधी खर्ची घालण्यात आला आहे. पण या रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. रविवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे एस. जी. बाळेकुंद्री कॉलेजसमोरील स्मार्ट रोडवर पाणीच पाणी झाले. रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नसल्याने रस्त्यावर एक फूट पाणी साचून होते. मागील पावसाळय़ात देखील अशाच प्रकारे पाणी साचून होते. याबाबत कोणताच तोडगा काढण्यात आला नाही. परिणामी वाहनचालकांना पाण्यामधूनच ये-जा करावी लागली. स्मार्ट सिटीच्या कामाचा नमुना चव्हाटय़ावर आला असून, स्मार्ट सिटी संकल्पना पावसाच्या पाण्यात वाहुन गेली असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. अशा प्रकारच्या निर्माण होणाऱया समस्येचे निवारण करण्यासाठी आवश्यक पाऊले उचलण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.









