प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेमध्ये शहराची निवड झाल्यानंतर ड्रीम प्रोजेक्ट म्हणून प्रायोगिक तत्वावर शिवबसवनगर येथील केपीटीसीएल रस्त्याचा विकास करण्यात आला आहे. अडीच वर्षाच्या कालावधीनंतर साकारण्यात आलेल्या स्मार्ट रस्त्यावर पावसामुळे पाणीच पाणी झाले. पाण्याचा निचरा झाला नसल्याने दीड फूट पाणी साचून होते.
स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या 20 शहरांच्या यादीत बेळगाव शहराची निवड झाली. त्यानंतर स्मार्ट रस्ते करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दोन रस्त्यांची निवड करण्यात आली. शिवबसवनगर येथील केपीटीसीएल रोड व मंडोळी रोडचा समावेश केला आहे. दोन्ही रस्त्यांच्या विकासासाठी 25 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली. यापैकी मंडोळी रोडच्या विकासाचे काम अद्यापही सुरू आहे. तर केपीटीसीएल रोडचे काम अडीच वर्षाच्या कालावधीनंतर पूर्ण करून रस्ता खुला करण्यात आला. या ठिकाणी जलवाहिन्या, विद्युत वाहिन्या, मोबाईल केबल, डेनेज वाहिन्या आदी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येकासाठी डक्ट निर्माण करण्यात आले आहे. रस्त्याचा विकास करण्यासाठी बराच कालावधी लागला. येथील विद्युत वाहिन्या व जलवाहिन्यांच्या जाळय़ामुळे रस्त्याचे काम पूर्ण होण्यास विलंब लागला. पण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नसल्याने संपूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी झाले असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. सांडपाणी जाण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गटार बांधण्यात आली आहे. ठिकठिकाणी चेंबर देखील करण्यात आले आहेत. तरी देखील अचानक पडलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नसल्याने केपीटीसीएल रोडवर एक ते दीड फूट पाणी साचले होते. या ठिकाणी रस्त्या शेजारी असलेल्या काही दुकानांमध्ये देखील पाणी शिरल्याने व्यावसायिकांची तारांबळ उडाली होती. तसेच काही तळघरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना देखील अडचणीचा सामना करावा लागला.
स्मार्ट सिटीच्या रस्त्यावर पावसामुळे पाणी साचल्याने कामाचा नमुना चव्हाटय़ावर आला आहे. पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने बनविण्यात आलेल्या स्मार्ट सिटीच्या ड्रीम प्रोजेक्टच्या रस्त्यावर पाणी साचल्याने सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील स्मार्ट रस्त्यांवर पावसाळय़ात अशाच प्रकारे पाणी साचणार का, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.









