स्वच्छता-देखभालीअभावी प्रवाशांची गैरसोय
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत विविध ठिकाणी बसथांबे उभारण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी बसथांब्यांची दुर्दशा झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. कॉलेज रोड येथील बसथांब्यांवर अस्वच्छता आणि देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांना बसथांबा सोडून बाहेर थांबावे लागत आहे.
शहरात विविध ठिकाणी स्मार्ट बसथांबे उभारण्यात आले आहेत. मात्र स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. काही महत्त्वाच्या ठिकाणी बसथांबेच नसल्याने प्रवाशांना ताटकळत थांबावे लागत आहे. शहरातील पहिला-दुसरा रेल्वेगेट, गोगटे सर्कल, नाथ पै चौक, आरपीडी क्रॉस आदी ठिकाणी बसथांब्यांअभावी प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. विशेषतः महिला प्रवासी व विद्यार्थिनींची हेळसांड होताना दिसत आहे.
शहरात असलेल्या स्मार्ट बसस्थानकांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने बसथांब्यांतील आसने धुळीने माखली आहेत. त्यामुळे बसस्थानकात येणाऱया बालकांना, वयोवृद्धांना रस्त्यावर उन्हात थांबावे लागत आहे. परिणामी वाहतुकीलादेखील अडथळा निर्माण होत आहे. बसथांब्यांतील आसनांची दुर्दशा झाल्याने प्रवाशांनी बसावे कुठे? असा प्रश्नदेखील निर्माण होत आहे. संबंधितांनी शहरातील बसथांब्यांची स्वच्छता करून प्रवाशांची सोय करावी, अशी मागणी होत आहे.









