फुटपाथवरील चेंबर झाकण्याकडे स्मार्ट सिटीचे दुर्लक्ष

प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरवासियांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र त्यासोबत समस्यादेखील मोफत उपलब्ध करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. पादचाऱयांसाठी फुटपाथ निर्माण केले आहेत. पण फुटपाथवरील असलेले चेंबर झाकण्याकडे स्मार्ट सिटीचे दुर्लक्ष झाले आहे.
स्मार्ट सिटी योजनेमधून शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून पादचाऱयांसाठी दुतर्फा फुटपाथ निर्माण करण्यात आले आहेत. तसेच रस्त्याशेजारी जलवाहिन्या आणि गटारीच्या वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. पण ठिकठिकाणी चेंबर उघडे ठेवले आहेत. काही ठिकाणी चेंबरभोवती लोखंडी सळय़ा असल्याने पदचाऱयांना धोका निर्माण झाला आहे. काँग्रेस रोडचे काँक्रिटीकरण करून तीन वर्षे उलटली. पण विकासकामे अद्यापही पूर्ण झाली नाहीत.
फुटपाथवर उघडय़ा चेंबरवर झाकण घालण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. पहिले व दुसरे रेल्वेगेटच्या दरम्यान असलेल्या चेंबरवर मोठा खांब घातला आहे. त्यामुळे पादचाऱयांना याची अडचण होत आहे. तसेच दोन्ही बाजूंनी चेंबर उघडे असल्याने अंधारात पाय अडकण्याचा धोका आहे. या ठिकाणचे बरेचशे पथदीप बंद आहेत. त्यामुळे पादचाऱयांना धोका निर्माण झाला आहे. तसेच स्वामी विवेकानंद कॉलनीकडे जाणाऱया रस्त्याशेजारी चेंबरवर झाकण घातले नाही. याठिकाणी उघडय़ा सळय़ा पादचाऱयांना अपघातास निमंत्रण देत आहेत. अशाप्रकारे शहरातील विविध ठिकाणी चेंबर उघडे असून धोका निर्माण झाला आहे. या चेंबरवर झाकण घालण्याकडे स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांचे तसेच कंत्राटदारांचे दुर्लक्ष झाले आहे.









