पांडवांचे प्रताप आठवीत शोकाकूल झालेले पितामह भीष्म हे बलराम व कृष्णाला पुढे म्हणाले-हे भगवंता! या पांडवांची कीर्ति त्रैलोक्मयात पसरली होती. युद्धात आपल्याला मदत करायला देवांनीही यांना पाचारण केले होते. स्वतःच्या चातुर्याने, युक्ती प्रयुक्तीने यांनी बृहस्पतीलाही डोलायला लावले होते. यांची युद्धात पराक्रम गाजवण्याची इच्छा अजून पूर्ण झाली नव्हती. अजून यांनी राज सिंहासन भोगले नव्हते. काय विचित्र, अघटित दैवगती की हे आगीच्या भक्षस्थानी पडावेत? यशोलक्ष्मीचे हे कीर्तिध्वज होते. वीरश्रीच्या उद्दाम भुजा, हात होते. ब्रह्मांड पेलू शकणारे हे पांडूचे बलवान पुत्र होते. समरांगणात जे आपल्या बाणांनी प्रत्यक्ष यमालाही आव्हान देऊ शकत होते असे हे वीर लाक्षागृहात जळाले. कुरुवंशाची भाग्यरेखा निमाली. असा विलाप पितामह भीष्मांनी केला. त्यांचे सांत्वन करताना बलराम व कृष्ण म्हणाले-पितामह! आपण केलेल्या कर्माचे फळ केव्हातरी आपल्याला भोगावे लागते. यालाच दैवगती किंवा ईश्वरेच्छा असे आपण म्हणतो. इथे आपण शोक करू नये.मग घेऊनि भीष्माज्ञा । पातले कृपाचार्यसदना । तेणें देखोनि रामकृष्णां । पाण्डुनंदनां आठविलें ।परस्परें पाण्डवगुण । स्मरोनि विलाप करिती जाण। रामकृष्णें पुसोनि नयन । केलें सांत्वन पूर्वोक्त।त्यानंतरें विदुरालया । जाऊनि सप्रेम भेटले तया । तन्मुखें वृत्तान्त परिसोनियां । केली स्नेहा अभिवृद्धि । विदुरा घेऊनि सांगतें । गेले गान्धारीमंदिरातें । स्नेहें भेटोनियां तयेतें । दु:खशोकांतें परिहरिती । देखोनियां राममुरारि । पाण्डवांचें दु:ख भारी । हंबरडा हाणोनि गान्धारी। जननियेसरी आक्रन्दे । म्हणे पाण्डूचें लोपलें नांव। कुंतीमाद्रीशीं पाण्डव । एकसरें निमाले सर्व। गोमयें ठाव पूसिला ।पाडसेंसहित कुंती हरिणी । जतुकागाराख्यदावाग्नी। माजि निमाली तळमळूनी । आतां कोठूनि भेटेल ।ऐसी विलपतां गांधारी । विदुरें सहित राममुरारि । संबोखिती नानापरी । मधुरोत्तरिं बोधोनी ।
पितामह भीष्मांचा निरोप घेऊन बलराम व कृष्ण कृपाचार्यांकडे आले. त्यावेळी पांडवांचे गुण आठवून सर्वजण विलाप करू लागले. कृष्णाने कृपाचार्यांचे डोळे पुसून त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर ते विदुराच्या घरी आले. त्याचे सांत्वन करून स्नेह वृद्धिंगत केला. विदुराला सोबत घेऊन ते गांधारीकडे पोहोचले. कौरवांच्या कट कारस्थानात गांधारी कधीच सहभागी झाली नाही. ती धूर्त धृतराष्ट्राची पत्नी, कपटी शकुनीची बहीण आणि महत्त्वाकांक्षी दुर्योधनाची आई असली तरी निर्मळ मनाची होती. तिला आपला पती, भाऊ व मुले पांडवांविरुद्ध करत असलेली कपट कारस्थाने मान्य नव्हती. वारणावतातील लाक्षागृहाला आग लागून त्या आगीत कुंतीमातेसह पाचही पांडव जळून भस्मसात झाले ही वार्ता ऐकून तिच्या मनाला मोठाच धक्का बसला. कुंतीबद्दलही तिच्या मनात अनुकंपा, आदर व प्रेम होते. महाराणी असूनही कुंतीला खूप दु:ख सहन करावे लागले होते. याबद्दल गांधारीला वाईट वाटे. विदुरासोबत बलराम व कृष्ण गांधारीला भेटले तेव्हा त्यांना पाहून गांधारीने हंबरडा फोडला आणि आपल्या दु:खाला मोकळी वाट करून दिली.
Ad. देवदत्त परुळेकर








