नवी दिल्ली / वृत्तसंस्था
इस्त्रायली दुतावासाबाहेर 29 जानेवारीला झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासासाठी इस्त्रायलमधील ‘मोसाद’चे पथक भारतात दाखल झाल्यानंतर आता तपासाला वेग आला आहे. ‘मोसाद’च्या अधिकाऱयांनी नुकतीच राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱयांची भेट घेतली. दोन्ही देशाच्या पथकांनी या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात आतापर्यंत झालेल्या प्रगतीची परस्परांना माहिती दिली.
भारतात एनआयए या स्फोटाचा तपास करत आहे. इस्त्रायलच्या यंत्रणाही त्यांच्या बाजूने आरोपींचा शोध घेत आहेत. ‘मोसाद’ ही इस्त्रालयची गुप्तहेर संघटना असून जगातील सर्वात धोकादायक गुप्तहेर संघटना अशी त्यांची ओळख आहे. प्राथमिक तपासातून या बॉम्बस्फोटामध्ये इराणचा हात असल्याचे संकेत मिळत आहेत. तपासात भारतीय यंत्रणांना मदत करण्यासाठी ‘मोसाद’चे पथक भारतात दाखल झाले आहे.









