वृत्तसंस्था/ पॅरीस
स्पेनचा माजी टॉप सीडेड पुरूष टेनिसपटू राफेल नदालने एटीपीच्या मानांकनात सलग 800 आठवडे पहिल्या दहा खेळाडूंमध्ये आपले स्थान राखण्याचा पराक्रम केला आहे.
सोमवारी एटीपीची ताजी मानांकन यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये स्पेनच्या नदालने दुसरे स्थान मिळविले आहे. सर्बियाचा जोकोव्हिच अग्रस्थानावर आहे. एटीपी मानांकनात यापूर्वी अमेरिकेच्या जिमी कॉनर्सने सलग 789 आठवडे पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्याचा विक्रम केला होता. 2005 च्या एप्रिल महिन्यात स्पेनच्या नदालने पहिल्यांदा एटीपीच्या मानांकनात पहिल्या दहा खेळाडूंत प्रवेश केल्यानंतर त्याने 15 वर्षांपेक्षा अधिक कालावधीत मानांकनातील हे स्थान कायम राखले आहे. 34 वर्षीय नदालने आतापर्यंत 13 वेळा पेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली आहे. एटीपीच्या मानांकनात पहिल्या दहा खेळाडूंमध्ये सर्वाधिक कालावधी (931 आठवडे) स्थान राखण्याचा स्वीसच्या रॉजर फेडररचा विक्रम अद्याप अबाधित आहे.
एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत सर्बियाचा जोकोव्हिच 12030 गुणांसह पहिल्या, स्पेनचा नदाल 9850 गुणांसह दुसऱया, ऑस्ट्रीयाचा थिएम 9125 गुणांसह तिसऱया, रशियाचा मेदव्हेदेव 8470 गुणांसह चौथ्या, स्वीसचा फेडरर 6630 गुणांसह पाचव्या, ग्रीकचा सिटसिपेस 5940 गुणांसह सहाव्या, जर्मनीचा ऍलेक्झांडर व्हेरेव्ह 5615 गुणांसह सातव्या, रशियाचा रूबलेव्ह 4164 गुणांसह आठव्या, अर्जेंटिनाचा शुवार्त्झंमन 3455 गुणांसह नवव्या आणि इटलीचा बेरेटेनी 3120 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.









