9 खेळाडूंत इंग्लंडचे 3, पाकचे 2, लंका, झिम्बाब्वेच्या एकेक खेळाडूचा समावेश
वृत्तसंस्था/ दुबई
टी-20 विश्वचषक स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीवरून स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूची निवड केली जाणार असून आयसीसीने आतापर्यंतच्या कामगिरीवरून 9 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीवर अंतिम फेरी गाठलेल्या इंग्लंड व पाकिस्तानच्या खेळाडूंचे वर्चस्व असून भारताच्या कोहली व सूर्यकुमार यादव या दोन खेळाडूंनाही नामांकन मिळाले आहे.
या स्पर्धेतील अनेक सामने शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेले पहावयास मिळाले. त्यात काही संघांनी व खेळाडूंनी अप्रतिम प्रदर्शन केल्याचे दिसून आले. अनेक चढउतार पाहत इंग्लंड व पाकिस्तान यांनी अंतिम फेरी गाठण्यात यश मिळविले असून त्यांच्यात रविवारी चॅम्पियनशिप लढत मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे.
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी खेळाडूंची यादी तयार करण्यात आली असून आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात या खेळाडूंनी मोलाची कामगिरी केली आहे. यामध्ये इंग्लंडच्या तीन, भारत व पाकिस्तानच्या प्रत्येकी दोन आणि लंका, झिम्बाब्वे यांच्या प्रत्येकी एक खेळाडूचा समावेश आहे.
कोहलीच्या सर्वाधिक धावा
भारताला उपांत्य फेरी गाठून देण्यात विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 98.66 धावांच्या जबरदस्त सरासरीने सहा सामन्यात 296 धावा फटकावल्या. 136.40 च्या स्ट्राईकने त्याने या धावा केल्या असून सध्या सर्वाधिक धावा जमविणाऱया खेळाडूंत तोच आघाडीवर आहे. या स्पर्धेत त्याने चार अर्धशतके नोंदवली, त्यात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात नाबाद 82 धावांच्या संस्मरणीय खेळीचा समावेश आहे.
‘बॅटर ऑफ द टूर्नामेंट’ सूर्या
सूर्यकुमार यादवने या स्पर्धेत अतर्क्य फटकेबाजी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मैदानाच्या सर्व कोनात केलेली त्याची फटकेबाजी पाहून सगळेच स्तंभित झाले असून एबी डीव्हिलियर्सनंतरचा दुसरा ‘मि. 360 डिग्री’ असे त्याला संबोधले जाऊ लागले आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने तर त्याला ‘बॅटर ऑफ द टूर्नामेंट’ म्हटले आहे. त्याने 6 डावांत 189.68 अशा जबरदस्त स्ट्राईकरेटने 239 धावांची बरसात केली. त्याने झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स यांच्याविरुद्ध अर्धशतके नोंदवली. या स्पर्धेच्या माध्यमातून त्याने आंतरराष्ट्रीय स्टेजवर आपले अस्तित्वच दाखवून दिले असे नव्हे तर टी-20 फलंदाजांच्या मानांकनातही त्याने अग्रस्थान पटकावले आहे.
सर्वेत्तम खेळाडूंसाठी नामांकन झालेल्या खेळाडूंत पाकचे शदाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, इंग्लंडचे जोस बटलर, ऍलेक्स हेल्स, सॅम करन, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, लंकेचा स्पिनर वणिंदू हसरंगा यांचा समावेश आहे.
अन्य खेळाडूंची कामगिरी
अष्टपैलू शदाब खानने न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य लढतीत चांगली कामगिरी केली तर द.आफ्रिकेविरुद्ध अर्धशतक झळकवले. त्याने 6 सामन्यांत 10 बळी मिळविले. शाहीन आफ्रिदी सुरुवातीला अपयशी ठरला. पण नंतरच्या चार सामन्यात त्याने 10 बळी घेतले. सॅम करन हा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो. त्याने 5 सामन्यांत 10 बळी मिळविले असून झिम्बाब्वेविरुद्ध त्याने 5 बळी टिपले. इंग्लंडचा कर्णधार बटलरने आयपीएलमधील फॉर्म या स्पर्धेतही कायम राखला असून त्याने 5 सामन्यांत दोन अर्धशतकांसह 199 धावा जमविल्या तर यष्टीमागे 8 बळी टिपले आहेत. ऍलेक्स हेल्सला बेअरस्टो जखमी असल्यामुळे या स्पर्धेत संधी मिळाली. त्याचे सोने करीत त्याने 5 सामन्यांत 211 धावा केल्या असून भारताविरुद्ध त्याने नाबाद 86 धावा झोडपत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.
झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाने या स्पर्धेत फलंदाजी व गोलंदाजीत कमाल करून दाखविली असून त्याच्या कामगिरीमुळे झिम्बाब्वेने काही अनपेक्षित निकाल नोंदवले. प्राथमिक फेरीसह त्याने 8 सामन्यांत 219 धावा जमविल्या आणि 10 बळी मिळविले. पाकविरुद्ध त्याने 25 धावांत 3 बळी मिळवित त्यांना पराभवाचा धक्का दिला होता. लंकेच्या हसरंगाने अप्रतिम फिरकी मारा करीत 15 बळी मिळविले. मागील वर्ल्ड कपमध्येही त्याने 16 बळी टिपले होते.









