मिनी टेम्पो व्यावसायिकांचा आंदोलन छेडण्याचा इशारा
वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी शहरात मिनी टेम्पोधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तालुक्यात स्थानिक ठेकेदार, बिल्डर्स यांनी कर्नाटकातील मुकादम यांनी आपले बस्तान बसवून टेम्पो, जेसीबी, ट्रक्टर, ट्रक, डंपर, बलेरो अशी वाहन उपलब्ध करून स्थानिक व्यावसायिकांवर कुऱहाड आणली आहे. असे प्रकार येत्या 31 डिसेंबरपर्यंत न थाबल्यास सर्व स्थानिक वाहनधारक व्यावसायिक आंदोलन छेडतील, असा इशारा मिनी टेम्पो व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष सुनील प्रभू केळुसकर, अजय जाधव, सतीश नार्वेकर, विशाल सावंत, कादर बेग आदींनी दिला. मंगळवारी या मिनी टेम्पो व्यावसायिकांनी स्थानिकांच्या होणाऱया गळचेपीविरोधात आंदोलन छेडले.
सावंतवाडी बाजारपेठेत मिनी टेम्पोस्थानक आहे. जवळपास 40 टेम्पोधारकांना गेले काही महिने व्यवसायच नाही. कोरोना महामागीमुळे धंदा गेला. आता तर स्थानिक ठेकेदारांनी, बिल्डर्सनी कर्नाटकातील मक्तेदारांकरवी मिनी टेम्पो, डंपर, ट्रक्टर, बलेरो कामगार पुरविणे असे व्यवसाय धंदे सुरु केल्याने स्थानिक बेरोजगार तरुणांना बँकेचे कर्ज काढून वाहने खरेदी केली ते कर्जाचे हप्ते व कुटुंब चालविणे अशक्य बनले आहे. वाहने दिवसरात्र उभी ठेवावी लागत आहेत. त्यामुळे मकुदम यांनी मिनी टम्पो, डंपर, जेसीबीचे व्यवसाय सुरु केले ते बंद करावे, अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल. सर्व कर्ज काढून घेतलेली वाहने स्थानिक बिल्डर्स, ठेकेदारांच्या कामासमोर उभी करून अनोखे आंदोलन उभारण्यात येईल, असे प्रभूकेळुसकर, जाधव यांनी स्पष्ट केले. यावेळी अनंत तुडपेकर, जमीर शेख, जमीर बेग, उमेश सावंत, अनंत वंजारी, समीर बेग, नितीन सुभेदार, सखाराम गवस, अस्लम बेग, केदार शेळके, अनिल तेली, कृष्णा राऊळ, उमेश टोपले आदी उपस्थित होते.









