हजारो किलोमिटरचा प्रवास करून विदेशी पाहुणा आला होता सिंधुदुर्गात : ‘मोठा समुद्री कावळा’ या नावाने स्थानिक मच्छीमारांना परिचित
- अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडासारख्या थंड देशातील आहे हा पक्षी रहिवासी
- समुद्रात सुर मारून मासे पकडण्यात आहे वाकब्गार
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
थेट विदेशातून हजारो मैलांचा प्रवास करीत सिंधुदुर्गात पोहोचलेल्या एका दुर्मिळ अशा जखमी ब्राऊन बॉबी (मोठा समुद्री कावळा) पक्षाला मातोंड गावातील स्थानिक रहिवाशांनी जीवदान देत त्याला वनखात्याच्या ताब्यात दिले.
मातोंड येथील दिलीप परब व गिरीश प्रभू यांनी या ब्राऊन बॉबी (मोठा समुद्री कावळा) पक्षाला जखमी अवस्थेत पकडले व वन विभागाचे अधिकारी सावळा कांबळे व पक्षी अभ्यासक प्रवीण सावंत यांच्या स्वाधीन केले. ब्राऊन बॉबी जखमी अवस्थेत होता. स्थलांतरीत पक्षी जखमी होण्याचे कारण स्थलांतराच्या दरम्यान पक्षांना वादळ, पाऊस याला सामोरे जावे लागते व? यामध्ये पक्षी भरकटतात व एखादे खडक, डोंगर, उंच झाड याला धडकून जखमी होतात. बऱयाच वेळी हे पक्षी भरकटतात व एकटेच दिसतात. कारण हे पक्षी आपल्या जीवनसाथीदाराला शोधण्यासाठी धडपड करीत असतात. साथीदाराच्या विरहामुळे हे पक्षी ताणतणावाखाली जातात व बेशुद्ध पडतात. या पक्षांचा रंग चॉकलेटी ब्राऊन असून पाय पिवळसर असतात. साधारणपणे त्यांचा आकार – 25.5 ते 33.5 इंच, 64-86 सें. मी. व वजन – 950 – 1700 ग्रॅम. असते. या पक्षाची पंख पसरवण्याची क्षमता – 132 – 155 सें. मी. एवढी असते. लहान पिल्ले पूर्ण ब्राऊन रंगाची असतात. हे पक्षी दक्षिण अमेरिका, ऑस्टेलिया, यू. एस. ए. कॅनडासारख्या थंड प्रदेशातून हजारो कि. मी. चा प्रवास करीत भारतामध्ये पोहोचतात.
सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये निवती रॉक, मोचेमाड, तारकर्ली, आचऱयासारख्या किनाऱयावर या पक्षांच्या आगमनाची नोंद आहे. नेहमी हे पक्षी आकाशमार्गे संचार करीत असताना मध्येच समुद्रात सूर मारून अचूक भक्ष पकडतात. नर-मादी एकत्रच असतात. आयुष्यभर ते एकत्र राहतात. घरटे हे-समुद्र किनारा, उंचवटे, डोंगर, खडकाळ भागात बांधतात व घरटय़ात साधारण निळसर रंगाची 1-3 अंडी घालून 42-45 दिवसांमध्ये उबवतात.
ब्राऊन बॉबी पक्षी हे एकपात्री मिलन करतात. नर हा मिलनामध्ये पुढाकार घेऊन हवेत उडतो व विशिष्ट आवाजाच्या सहाय्याने मादीला आकर्षित करून घेतो. विणीच्या हंगामात नर आपल्यासाठी योग्य जागा निवडून काडी कचरा तसेच झाडाच्या फांद्या, पाने वापरून घरटे तयार करतो. सध्या हे पक्षी घरटे बनवण्यासाठी सरासरी 90-91 टक्के प्लास्टिकच्या वस्तू वापरतात. याला जबाबदार आपण करीत असलेले प्लास्टिक प्रदूषण होय. कोलंबी, खेकडे, बांगडा, तारली मासे हे या पक्षांचे मुख्य अन्न आहे. भक्ष पकडण्यासाठी हे पक्षी उंचावरून झेप घेऊन विविध प्रकारच्या पद्धतीने भक्ष पकडतात. लांब शेपटी व टोकदार चोचीच्या सहायाने हे पक्षी सहज भक्ष पकडतात.
ब्राऊन बॉबी या पक्षांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. कारण स्थलांतराच्या दरम्यान पक्षांचा मृत्यू, प्रजननासाठी माणसाचे अडथळे, अंडय़ाचे नुकसान, नैसर्गिक आपत्ती अशा विविध कारणांमुळे या पक्षांची संख्या घटत असल्याची माहिती संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे पक्षी अभ्यासक प्रवीण शशिकांत सावंत यांनी दिली.









