प्रतिनिधी / बेंगळूर
रेल्वेला करण्यात आलेली विनंती एकाएकी मागे घेण्याचा निर्णय घेणाऱ्या कर्नाटक सरकारने आता घूमजाव केले आहे. राज्यात अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी कर्नाटक सरकारने शुक्रवारपासून विशेष गाडय़ांची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी स्थलांतरित कामगार ज्या राज्यांमधील आहेत त्या राज्यांकडून मान्यता देण्याची मागणी केली आहे.झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान आणि ओडिशा या राज्यांना सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती देणारे पत्र कर्नाटक सरकारने गुरुवारी पाठविले असून या कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविण्याबाबत संबंधित राज्य सरकारने मान्यता द्यावी अशी मागणी केली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.