कोरोनाच्या वाढत्या संसर्गादरम्यान झालेल्या एका संशोधनाने काही अपेक्षा जागविल्या आहेत. या संशोधनानुसार कोविड-19 च्या गंभीर स्वरुपातील आजारी रुग्णांचा जीव स्वस्त स्टेरॉयड औषधाने वाचविला जाऊ शकतो. या संशोधनावर जागतिक आरोग्य संघटनेने शिक्कामोर्तब केले आहे. स्टेरॉयड औषधे कोरोनाच्या गंभीर रुग्णांना दिली जाऊ शकतात. ही औषधे संसर्गामुळे होणाऱया मृत्यूचा आकडा 20 टक्क्यांनी कमी करू शकतात. परंतु ही औषध प्रारंभिक लक्षणे असलेल्या रुग्णांना देण्याची गरज नसल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशनमध्ये या नव्या संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित झाले आहेत. कोरोनाने आजारी पडलेल्या 100 पैकी किमान 8 जणांचा जीव स्टेरॉयडच्या वापराने वाचविला जाऊ शकतो. संशोधनाचे निष्कर्ष प्रभावशाली असले तरीही स्टेरॉयड कोरोनावरील उपचार नसल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
डब्ल्यूएचओची भूमिका
स्टेरॉयड औषधांच्या तीन चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधिताला ही औषधे दिल्यास मृत्यूचा धोका कमी होत असल्याचे चाचण्यांमधून समोर आले आहे. चाचण्यांदरम्यान रुग्णांना डेक्सामेथासोन, हायड्रोकॉर्टिसोन आणि मिथाइलप्रेडिसोलोन यासारखी स्टेरॉइड औषधे देण्यात आली. त्यांच्या मदतीने रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासह शरीराती सूजही कमी करता येते. स्टेरॉयडच्या चाचण्या ब्रिटन, ब्राझील, चीन, फ्रान्स, स्पेन आणि अमेरिकेत झाल्याची माहिती डब्ल्यूएचओच्या क्लीनिकल केयर प्रमुख जेनेट डियाज यांनी दिली आहे.
संशोधनाचे स्वरुप
या नव्या संशोधनात जगभरात कोरोनाबाधितांवर होत असलेल्या स्टेरॉयडच्या वापराच्या क्लीनिकल ट्रायलची माहिती सामील करण्यात आली. कोरोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये डेक्सामेथासोन आणि हायड्रोकॉर्टिसोन हे दोन स्टेरॉयड प्रभावी ठरू शकतात, असे संशोधनात दिसून आले आहे. वर्षाच्या प्रारंभी स्थिती अत्यंत निराश करणारी होती. परंतु आता 6 महिन्यांमध्ये आम्हाला विश्वासार्ह आणि उच्च गुणवत्तायुक्त चाचण्यांचे स्पष्ट निष्कर्ष मिळाले असून त्याद्वारे आम्ही या घातक आजाराला तोंड देऊ शकतो, असे उद्गार लंडनच्या इंपीरियल कॉलेजचे प्राध्यापक अँथोनी गॉर्डन यांनी काढले आहेत.
स्टेरॉयडचा गुणधर्म
सर्वसाधारणपणे स्टेरॉयड मानवी शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे आणि सूज कमी करण्यासाठी वापरले जाते. यांचा वापर अस्थमा सारख्या आजारांसह गंभीर संक्रमणाप्रकरणी केला जातो. कोरोना संसर्गाच्या प्रारंभिक टप्प्यात स्टेरॉयड औषधे अधिक प्रभावी ठरत नाहीत, परंतु संसर्ग वाढू लागल्यावर त्यांचा अधिक प्रभाव प्रतिकारकशक्तीवर पडतो. कोरोना शरीराच्या इम्यून सिस्टीमवरच सर्वाधिक दबाव टाकत असल्याने तो फुफ्फुस आणि शरीरातील अन्य अवयवांना नुकसान पोहोचवू शकतो.









