स्टेट बॅंकेकडून आता फिरती एटीएम सेवा,
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या विळखा दिवसेंदिवस वाढत असून सर्वच लोकांना ऑनलाईन पेमेंट करणे शक्य होत नाही. यामुळे सर्वसामान्य, वयोवृद्ध एटीएमचा वापर करत आहेत.
या पार्श्वभूमीवर स्टेट बॅंक ऑफ इंडियाने लोकांना गरजेच्या वेळी पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी सातारा शहर व परिसरात फिरती एटीएम सेवा सुरू केली आहे. “एटीएम आपल्या दारी’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून एटीएम कार्डधारकांना बॅंकेने दिलासा दिला आहे.
जगभरात थैमान घातलेय्ग्नाा कोरोनामुळे गरीब-गरजु, सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. काही अंशी लॉकडाऊन शिथील करण्यात आले तरी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडण्यास अद्याप बंदी घातली आहे. त्यामुळे गरजेच्या वस्तू घेण्यासाठीही लोकांकडे बॅंक खात्यात पैसे असले तरी ते काढायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकांची ही अडचण लक्षात घेऊन भारतीय स्टेट बॅंकेच्या सातारा क्षेत्रीय कार्यालयाने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. लोकांची अडचण दूर करण्यासाठी स्टेट बॅंकेने सातारा शहरात फिरते एटीएम सुरु करण्याचा निर्णय घेत त्यांची अंमलबजावणीही केली आहे. शुक्रवारी (दि. 8) या फिरत्या एटीएम सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
एटीएमचे वाहन ठिकठिकाणी विशिष्ट वेळेत जाऊन लोकांना पैसे मिळावेत, यासाठी स्टेट बॅंकेने वेळेचे नियोजन केले आहे. त्यानुसार बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सकाळी 9 ते 11, शाहूपुरी चौकात सकाळी 11.15 ते 1.15, फुटका तलाव परिसरात दुपारी 1.30 ते 3.30, एसटी स्टॅण्ड परिसरात दुपारी 3.45 ते 5.45, राजवाडा परिसरात सायंकाळी 6 ते 7 या वेळेत फिरती एटीएम सेवा सुरु राहणार आहे. स्टेट बॅंकेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या फिरत्या एटीएम सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन क्षेत्रीय प्रबंधक संदीप मून यांनी केले आहे.








