मुलांना ऑनलाईन शिक्षण मिळत नसल्याचे उचलले पाऊल
कोरोना महामारीने जगात बरेच काही बदल घडवून आणले आहेत. मुलांच्या शिक्षणावर याचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला आहे. मुलांना मोबाईल, लॅपटॉपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. योग्य नेटवर्क नसल्याने गावात शिकणाऱया मुलांच्या शिक्षणावर प्रतिकूल प्रभाव पडत आहे. मध्यप्रदेशच्या सागर जिल्हय़ात गरीब मुलांचे शिक्षण प्रभावित होऊ नये म्हणून एका सरकारी शाळेच्या शिक्षकाने चालते-फिरते वाचनालयच निर्माण केले आहे.
मध्यप्रदेशच्या सागर जिल्हय़ातील सरकारी शाळेतील शिक्षक सी.एच. श्रीवास्तव यांनी स्वतःच्या स्कुटरवरच चालते-फिरते वाचनालय तयार केले आहे. या वाचनालयात मुलांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित सर्व पुस्तके असण्यासह अन्य आवश्यक पुस्तकेही उपलब्ध आहेत. मुले या वाचनालयाचा मोठा वापर करत असून जोरदार अभ्यास करत आहेत.
या वाचनालयाचा वापर करणारे बहुतांश विद्यार्थी गरीब कुटुंबांशी संबंधित आहेत. आर्थिक संकटामुळे ते फोन किंवा लॅपटॉप खरेदी करू शकत नाहीत तसेच कोविडमुळे या मुलांच्या शिक्षणावर मोठा प्रभाव पडला आहे. हाच विचार करून एक छोटे वाचनालय तयार केल्याचे श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.
या वाचनालयात मुलांच्या अभ्यासक्रमाशी संबधित पुस्तकांसह कथा, कवितासंग्रह इत्यादींची पुस्तके देखील आहेत. मुलं या पुस्तकांच्या वाचनाचा आनंद घेत आहेत. शिक्षक श्रीवास्तव यांच्या या उपक्रमाची समाजाच्या सर्वच स्तरांमधून प्रशंसा होत आहे. अरुणाचल प्रदेशच्या पापुम पारे जिल्हय़ातील रहिवासी नेंगुरंग मीणा यांनी स्वतःच्या राज्यातील पहिली रोडसाइड लायब्रेरी सुरू केली होती. मुलांमध्ये वाचनाची आवड विकसित करणे हा यामागचा उद्देश होता.









