‘तरूण भारत’ समूह प्रमुख, सल्लागार संपादक किरण ठाकुर यांचे प्रतिपादन
कोल्हापूर प्रतिनिधी
जगात शांतता नांदावयाची झाल्यास शांतीप्रिय भारताने महासत्ता बनून जगाचे नेतृत्व करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे. त्यामुळे तरुणांनी शास्त्रज्ञ होण्यासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याप्रमाणे भारावून जाऊनच काम केले पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात सौर ऊर्जेचा (सोलर एनर्जी) वापर केला तर भारत जगातील नंबर वन देश होईल, असे प्रतिपादन ‘तरुण भारत’ समूह प्रमुख, सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी केले.
‘आजादी का अमृत महोत्सवा’चे औचित्य साधून डीएसटी-स्तुती कार्यक्रमाअंतर्गत शिवाजी विद्यापीठात 22 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत विज्ञान जागृती सप्ताह आयोजित केला आहे. या विज्ञान सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून किरण ठाकुर यांनी मार्गदर्शन केले. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते. केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सल्लागार डॉ. श्याम कोहली यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात विविध शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थिंनींचा सहभाग होता.
किरण ठाकुर म्हणाले, 1857 च्या स्वातंत्र्य युद्धानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यास तब्बल 90 वर्षे लागली. इंग्रजांनी आपल्या स्वातंत्र्य दिलेले नाही तर आपल्या स्वातंत्र्य लढय़ातील स्वातंत्र्ययोद्धय़ांनी त्याग, बलिदान देत स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. आजच्या पिढीने स्वातंत्रवीरांच्या त्यागाची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.
किरण ठाकुर म्हणाले, 17, 18 आणि 19 व्या शतकात युरोपला नामवंत शास्त्रज्ञ लाभले. त्यांनी मानवी जीवन बदलविणारे विविध प्रकारचे नवनवीन शोध लावले. त्या काळात आपला देश पारतंत्र्यात, गुलामगिरीत होता. त्यामुळे शास्त्रज्ञ तयार होऊ शकले नाहीत. आपल्या देशाला ऋषी, मुनीची परंपरा असताना, योगविद्येसारखी शक्ती असताना शास्त्रज्ञ तयार होण्यास स्वातंत्र्यानंतरचा काळ यावा लागला.
स्वातंत्र्यानंतर भारतातील शास्त्रज्ञांनी काय केले हे सांगण्यासाठी ‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरूणांनी मनात घेतले तर 2050 मध्ये मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील शक्तीशाली भारत होईल, असे सांगून किरण ठाकुर म्हणाले, 1918 मध्ये जगभरात फ्ल्यू साथ आली. अमेरिकन सैनिक ज्या ठिकाणी गेले तेथे त्यांनी फ्ल्यू पसरविला. 1 कोटी 20 लाख लोक मृत्युमुखी पडले. शंभर वर्षांनी आज चीनने कोरोनाच्या विषाणूचे जैविक हत्यार करून जगाचे नुकसान केले. त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञांनी शोध लावून मानवी आयुष्य सुखकर करावे. नव्या पिढीतील शास्त्रज्ञांनी ही जबाबदारी पार पाडावी.
जागतिक शांततेसाठी भारत शक्तीशाली बनणे आवश्यक
जागतिक स्थितीवर भाष्य करताना किरण ठाकुर म्हणाले, आज जगात अमेरिका, रशिया, चीन हे शक्तीशाली देश आहेत. पण जगात जर शांतता नांदायची असेल तर भारताला शक्तीशाली देश बनून जगाचे नेतृत्व करावे लागेल. आपल्या देशात ती क्षमता आहे. शास्त्रज्ञांच्या जोरावर आपण शक्तीशाली बनू शकतो. त्यासाठी सौरऊर्जा अर्थात सोलर एनर्जीचा वापर संशोधनासह सर्वच क्षेत्रात वाढविला पाहिजे, असे ठाकुर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञानातील संधी पोहचविण्यासाठी स्तुती उपक्रम ः डॉ. कोहली
केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सल्लागार डॉ. श्याम कोहली म्हणाले, केंद्र सरकारने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सार्वत्रिकीकरणासाठी ‘स्तुती’ हा उपक्रम हाती घेतला आहे. विद्यापीठीय परीघाबाहेरील विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञानातील संधींची माहिती पोहोचविण्यासाठी या उपक्रमाचा लाभ व्हावा.
विद्यार्थ्यांनो प्रश्न विचारा, शंकांचा समाधन करून घ्या ः कुलगुरू डॉ. शिर्के
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण आणि अभ्यासाचा मंत्र दिला. ते म्हणाले, विद्यार्थीदशेत प्रश्न पडणे प्रगतीच्या शक्यतेच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे समाधान करवून घेणे महत्त्वाची बाब आहे. विद्यापीठात ज्ञानसंवर्धनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. डीएसटीच्या माध्यमातून येथे अनेकविध प्रकल्प आणि साधनसुविधा उपलब्ध आहेत. त्यांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी येथून बाहेर पडताना उराशी एक स्वप्न बाळगावे.
प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी प्रास्ताविकात शिवाजी विद्यापीठाने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या संशोधनाची माहिती दिली. तसेच शास्त्रज्ञ तयार करण्यासाठी विविध विज्ञानशाखांत असलेल्या सुविधा, साधनांविषयीही अवगत केले.
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. आर के कामत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डीएसटी-सैफ केंद्राचे प्रमुख डॉ. आर.जी. सोनकवडे यांनी आभार मानले. अश्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमात शाळा, ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
कार्यक्रमाला किशनराव मोरे हायस्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेज सावरवाडी, कमला कॉलेज ज्युनिअर कॉलेज, देवाळे विद्यालय ऍन्ड ज्युनिअर कॉलेज देवाळे, एस. एम. लोहिया कॉलेज, सिध्दनेर्ली हायस्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेज, गुरूवर्य गुरूनाथ विठ्ठल पाटील ज्युनिअर कॉलेज हलकर्णी, श्रीराम व्ही. पी. देसाई ज्युनिअर कॉलेज, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हास्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेज, वाय. सी. कॉलेज, सीएचएच. शिवाजी ज्युनिअर कॉलेज पन्हाळा, कोकण एज्युकेशन सोसायटी एस. इस. ज्युनिअर कॉलेज बेळगाव, राजे रामराव ज्युनिअर कॉलेज जत, वत्सलालाबाई रामचंद्र दिवटे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, विटा आदींचे विद्यार्थी उपस्थित होते.
किरण ठाकुर यांचा गौरव
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने या कार्यक्रमात तरुण भारतचे समूह प्रमुख सल्लागर संपादक किरण ठाकुर यांचा सत्कार करण्यात आला. प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते ठाकुर यांना गौरविण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. आर के कामत, डीएसटी-सैफ केंद्राचे प्रमुख डॉ. आर.जी. सोनकवडे यांनी ठाकुर यांच्या कार्यावर गौरवोद्गार काढले.
अखंड भारत जगात शक्तीशाली असता
इंग्रजांनी जाणीवपूर्वक फूट पाडून अखंड भारताची फाळणी घडवून आणली. भारत, पाकिस्तान फाळणी झाली नसती तर आज अखंड भारत राहिला असता. आपली सैनिकी ताकद जगात सर्वात शक्तीशाली असती. भारत सर्वात शक्तीशाली देश असता, तो शक्तीशाली होऊ नये म्हणून इंग्रजांनी जात, धर्माच्या आधारावर फूट पाडली, फाळणीचेही कारस्थान यशस्वी केले. त्याचे परिणाम आजही आपण भोगत आहोत, याकडे किरण ठाकुर यांनी लक्ष वेधले.