सोशल मीडियावर पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज यांच्यापासून सर्व लेखकांचे साहित्य उपलब्ध
कोल्हापूर / अहिल्या परकाळे
मराठी भाषा प्रत्येक कालखंडात प्रवाही होत असते. मराठी भाषा काळानुसार सर्व बदल स्वीकारत इतर भाषांना आपल्यात सामावून घेत पुढे जात आहे. आधुनिक जगात व्हॉटसऍप, व्टिटर, इन्स्टाग्राम, ब्लॉग, फेसबुक, युटय़ुबवरील बोली भाषा मराठी भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. प्रत्येक देशातील मराठी माणूस मराठी भाषेबरोबर जोडला आहे. याचाच अर्थ तंत्रज्ञानामुळे मराठी भाषा चौकटीच्या बाहेर जाऊन बोलली, वाचली आणि आत्मसात केली जाते. सोशल मीडियावर पु. ल देशपांडे, व. पु. काळे, कुसुमाग्रज, प्राचार्य दत्ता भोसले अशा अनेक लेखकांची पुस्तके श्राव्य माध्यमातून उपलब्ध आहेत. हेच मराठी भाषा संवर्धनाचे नवे परिमाण म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मराठी भाषा संवर्धनासाठी शासन, विद्यापीठ, महाविद्यालये, शाळा विविध उपक्रम राबवतात. यामध्ये इतर भाषांमधील शब्दांचे रुपांतर मराठीत करणे, भित्तीपत्रक, कथा, कविता वाचन, युवावाणी, एकांकिका, मराठी पुस्तक समजून घेताना, सर्जनशील लेखन, चर्चासत्रांच्या माध्यमातून मौखिक वाड्.मय परंपरेतून आलेल्या साहित्याचा संग्रह केला जात आहे. विद्यापीठांसोबत महाविद्यालयांच्या व्यासपीठावर रुढीपरंपरा, लोकसाहित्य, लोककला, ओव्या अशा प्रत्येक मौखिक परंपरेचे संवर्धन करण्यास प्राधान्य दिले जात आहे. प्रत्येक मैलावर बदलणाऱया भाषेचे संवर्धन अनेक साहित्यिक करीत आहेत. मराठी भाषेला इतर भाषेचे वावडे नसल्याने सर्व भाषांना सामावून घेत ती पुढे पुढे जात आहे. मराठी भाषा शुद्धीपेक्षा दैनंदिन वापरातील असली पाहिजे, ही आग्रही मागणी पुढे येत आहे. विद्यार्थ्यांचा इंग्लिश मीडियमकडे वाढणारा ओढा, भारताच्या प्रशासकीय कामकाजात वापरली जाणारी इंग्रजी भाषा पाहून मराठीचे अस्तित्व संपते की काय? अशी भीती व्यक्त होत होती. परंतू आधुनिक तंत्रज्ञानात मराठी भाषा आपले विकासाचे नवे रुप घेऊन येत आहे. त्याकडे सजगतेने पाहण्याची गरज आहे. आपली भाषा इतरांना रूचेल का? याचा विचार न करता आत्मविश्वासाने मराठी माणूस आपल्या बोली भाषेत सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहे.
संवर्धनासाठी विविध उपक्रम
तंत्रज्ञानाच्या युगातही मराठी भाषेत पुस्तके, कविता, ललित लेखन, स्फुटलेखन आदींच्या माध्यमातून साहित्यिक मराठी भाषेचे संवर्धन करीत आहेत. साहित्यिकांच्या या प्रयत्नाला शासनाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, ‘पुस्तकांचे गाव’सारखे उपक्रम राबवून बळ दिले आहे. अलीकडे शासन स्तरावरील बहुतांश आदेश मराठीत प्रसिद्ध होत आहेत. दुकानावरील पाटय़ा मराठीत असाव्या याची सक्तीदेखील केली जात आहे. तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी शासन स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तरीही लेखक, समीक्षक, कवींनी हातात हात घालून पुढे गेले पाहिजे. त्यामुळे मराठी भाषा संवर्धन जागर 365 दिवस केला पाहिजे.
सोशल मीडियावर मराठी भाषेच्या विकासाचा खळखळता प्रवाह
सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलीभाषेचे अंतरंग समजून घेतले जात आहे. ही भाषा विकासाची नांदीच म्हणावी लागेल. मराठी भाषेचा विकास आधी झालेलाच आहे, पण प्रत्येक टप्प्यात ती नवे रुप येत असल्याने, सकारात्मक वृत्तीने विकास टिकवून त्यात भर घालता आली तर निश्चित घालावी. समाज माध्यमावर बोलू ते प्रिंट होत आहे, याचा अर्थ आपण पेन-पेन्सिलने मराठी भाषा लिहिण्याचे विसरून चाललो आहोत, की काय? अशी शंका निर्माण होत आहे. हा धोका लक्षात घेऊन सोशल मीडियावर मराठी भाषेने आपल्या विकासाचा प्रवाह खळखळता ठेवला आहे, हे निश्चित आशादायी चित्र आहे. – डॉ. सुजय पाटील (मराठी विभागप्रमुख, कमला कॉलेज)
मराठीतील बोलीभाषा
पावरी, बंजारा, चंदगडी, वऱडाडी, अहिराणी, मालवणी, आदिवासी, कोकणी, कोल्हापुरी, वाडवळी, सोलापुरी, तंजावरची, झाडी, ठाकरी, गोंडी, सामदेवी, मराठवाडी, तावडी, दखनी, अशा अनेक मराठी बोली भाषा आहेत.