प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाचा उदेक वाढत चालला आहे. तरीदेखील सरकारी कार्यालये सुरूच आहेत. येथील आरटीओ कार्यालयदेखील जनतेला समस्या निर्माण होऊ नये यासाठी सुरू ठेवण्यात आले आहे. मात्र, जनतेमध्ये अजूनही सोशल डिस्टन्सबाबत जनजागृती नाही. त्यामुळे खुद्द आरटीओ शिवानंद मगदूम रांगेत उभे राहिलेल्या व्यक्तींना सोशल डिस्टन्स पाळण्याची सूचना करत होते. जे सोशल डिस्टन्स पाळत नाहीत त्यांची कामे थांबवा, असे येथील कर्मचाऱयांना त्यांनी सुनावले आहे. यामुळे सारेजण आता सोशल डिस्टन्स पाळताना दिसू लागले आहेत.
कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग संकटात सापडले आहे. त्याला भारतही अपवाद नाही. मात्र बेळगाव येथील एक मुख्य कार्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱया आरटीओ (रस्ते वाहतूक कार्यालय) येथे सुरक्षित अंतर ठेवण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष झाले होते. यासाठी आरटीओ शिवानंद मगदूम यांनी मंगळवारी स्वतःहून नागरिकांना आवाहन करत नियमांचे पालन करण्यास सांगितले.
आरटीओ कार्यालय परिसरात आता मार्किंग करण्यात आले आहे. त्या मार्किंगमध्येच नागरिकांनी उभे राहून सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे. याचबरोबर ज्यांनी कोणी हा नियम मोडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची कामे करून देऊ नका, असे अधिकाऱयांनी सांगितले. त्यामुळे आरटीओ कार्यालयात सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर आरटीओ मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. वाहन परवाना काढणे, त्यासाठी अर्ज भरणे, परवान्यासाठी लागणारी फी भरणे, वाहनांची नोंद करणे यासह अनेक कामांसाठी नागरिक या ठिकाणी गर्दी करत होते. मात्र आरटीओ शिवानंद मगदूम यांनी पुढाकार घेऊन सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.









