तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून मुंबई येथील सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक हरीश बैजल यांच्या नियुक्तीचे आदेश शुक्रवारी निघाले आहेत.
23 ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची पदोन्नतीवर मुंबई येथे सुधार सेवेचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पदोन्नतीवर बदली झाली होती व त्यांच्या जागी ठाणे येथील पूर्व विभागाचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले होते. परंतु कराळे यांनी दीड महिन्यात सोलापूरचा पदभार घेतला नव्हता. त्यामुळे पोलीस आयुक्त शिंदे यांना पदभार सोडता आला नव्हता.
दरम्यान, शुक्रवारी कराळे यांच्या सोलापूरच्या बदलीचे आदेश रद्द झाले असून सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून बैजल यांच्या नियुक्तीचे आदेश गृहविभागाने काढले आहेत.