तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर काँग्रेस भवनातील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिमा असलेल्या फलकावर शाई फेकून दगड भिरकावल्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला. अज्ञात माथेफिरूकडून झालेल्या या घटनेचा काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला.
काँग्रेस भवन परिसरात काँग्रेस अंतर्गत विविध आघाड्यांचे फलक आहेत. या फलकांवर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष प्रकाश वाले तसेच विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱयांच्या प्रतिमा आहेत. शनिवारी सकाळी अज्ञात माथेफिरूने या फलकांवर काळी शाई फेकली. त्यानंतर दगडफेक केल्याने फलकाचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती समजताच शहराध्यक्ष प्रकाश वाले तसेच इतर पदाधिकारी काँग्रेस भवनात दाखल झाले. याबाबतची माहिती जेलरोड पोलीस ठाण्याला देण्यात आली. दरम्यान, फलक स्वच्छ करून घेण्यात आला. घडलेल्या प्रकाराचा छडा लावून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार देण्यात येईल, असे सांगून शहराध्यक्ष वाले यांनी काँग्रेसमधील कोणत्याही व्यक्तीने हा प्रकार केल्याचे नाकारले. काँग्रेस पक्षाचे काम जोरात सुरू असल्याने निंदकानेच हे कृत्य केले असल्याचा दावा वाले यांनी केला आहे. हे निंदक दुचाकीवरून आले होते, अशी माहितीही वाले यांनी यावेळी दिली. या घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन वाले यांनी केले असल्याचे सांगितले.
त्या निंदकाचा नक्कीच छडा लावू
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिमा असलेल्या फलकावर शाई आणि दगडफेक करणे हे खालच्या वृत्तीच्या व्यक्तीचे काम आहे. हा व्यक्ती नक्कीच काँग्रेस पक्षाचा निंदक आहे. या निंदकाचा छडा लावून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू. काँग्रेस भवनात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो कैद झाला आहे. लवकरच त्याला समाजासमोर आणू.

निंदनीय घटनेचा निषेध
तळागाळातील जनतेचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेस सक्षम पर्याय म्हणून दिसत असतानाच हा निंदनीय प्रकार घडला. विधायक काम करण्याचं धाडस नसलेल्या व्यक्तींकडूनच हा प्रकार करण्यात आला, याचा जाहीर निषेध. योग्य ती कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार करणार.










