सोलापुरात दिवसभर पावसाची रिपरिप
सोलापूर/प्रतिनिधी
सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध भागात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. सकाळी आठ वाजल्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. कधी संततधार तर कधी जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शहरातील बाजारपेठा, भाजी मंडई रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. सकाळपासून ते सायंकाळपर्यंत पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. दिवसभर सूर्यनारायणचे दर्शन झाले नाही.
जून महिना उजाडला आणि सोलापूर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी लावली आहे. तालुक्यासह, शहरात ही पावसाने चांगली हजेरी लावली. 1 जून ते 15 जूनपर्यत सरासरी 52 मि.मि पावसाची नोंद झाली आहे. पंढरपूर , दक्षिण सोलापूर, बार्शी, माळशिरस, सांगोला, मोहोळ , मंगळवेढा या तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. सकाळी आठ वाजल्यापासून हजेरी लावल्याने दरम्यान एक ते दोन तासात पावसाची रिपरिप सुरूच होती. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठांमध्ये ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. दिवसभर पावसाची संततधार सुरू होती काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत होता. मंगळवारी झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते.
सोलापूर जिल्ह्यात 1 जून ते 15 जून पर्यंत पावसाने विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह सोलापूर शहर जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात आतापर्यंत 50.75 मी.मी पावसाची नोंद झाली आहे. तर 104.36 टक्के पाऊस पडला आहे. मान्सूनपूर्व पाऊस दमदार झाल्यामुळे सोलापूरकर व शेतकरी समाधानी आहेत. मंगळवारी झालेल्या पाऊस ग्रामीण भागातील पेरण्यासाठी लाभदायक असल्याचे सांगण्यात आले