तरुण भारत संवाद प्रतिनिधी / वैराग
बार्शी तालुक्यातील वैराग येथे तीन मजली रद्दी व्यवसाय व पुस्तक विक्री दुकानाला लागलेल्या आगीत दुकान मालकाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. 23) पहाटे सव्वा तीनच्या सुमारास वैराग ग्रामपंचायत कार्यालयाजवळ घडली. योगेश सीताराम गुप्ता (वय 45, रा. वैराग, ता. बार्शी) असे आगीत होरपळून मरण पावलेल्या दुकान मालकाचे नाव आहे. या घटनेची नोंद वैराग पोलिसांत झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वैराग ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारी गुप्ता बंधू हे तीन मजली पुस्तके विक्री व रद्दीचा व्यवसाय करतात व भाड्याने पंढरपूर अर्बन बॅंकेसमोर राहतात.
शनिवारी (ता. 23) पहाटे तीन वाजता नळाला पाणी येणार असल्याने योगेश गुप्ता हे दुकानात झोपले होते. मात्र पहाटेच्या सुमारास अचानक दुकानाला आतून आग लागली. या आगीमुळे पुस्तके, पेपर व इतर साहित्याने पेट घेतल्याने धुराचे लोट उठले. याबाबत नागरिकांनी लागलीच अग्निशामक दल व पोलिसांना खबर दिली. अग्निशामक दल, पोलिस व ग्रामस्थांनी लोखंडी शटर तोडण्याचा प्रयत्न केला असता शटर तुटले नाही. शेवटी दुकानाची भिंत पाडून आत प्रवेश केला असता आत झोपलेल्या योगेश गुप्ता यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत दिसून आला.
ही आग आतूनच शॉर्ट सर्किटने लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची खबर मृत योगेश गुप्ता यांचा भाऊ विजयकुमार सीताराम गुप्ता (वय 32, रा. वैराग, ता. बार्शी) यांनी वैराग पोलिसात दिली आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर हे करीत आहेत.