कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांची माहिती
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान संकुलाअंतर्गत यंदाच्या वर्षापासून एम ए योगा हा दोन वर्षे कालावधीचा नवीन अभ्यासक्रम सुरु होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
भारतात व महाराष्ट्रात योग या विषयास अलीकडच्या काळात आलेले महत्व तसेच कोरोनाच्या साथीमुळे योगाविषयी लोकांमध्ये रुची निर्माण झाली आहे. योग विषयातील शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. योग विषयात पदव्युत्तर शिक्षण मिळण्याची सोय सोलापुरात उपलब्ध नसल्याने येथील विद्यार्थ्यांना बेंगलुरू, पुणे, नागपूर अशा ठिकाणी जावे लागते. विद्यार्थ्यांची ही अडचण व मागणी लक्षात घेऊन योग विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेण्याची सोय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेली आहे. नुकतीच याबाबत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली असल्याची माहिती कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी दिली.
हा अभ्यासक्रम दोन वर्षे कालावधीचा असून त्याला कोणत्याही शाखेचा पदवीधर प्रवेश घेऊ शकतो. विद्यार्थी सदर अभ्यासक्रम मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत शिकू शकतो. त्याचसोबत शरीरशास्त्र, आहारशास्त्र, मानसशास्त्र, शारीरिक फिटनेस व व्यायाम असे विविध आधुनिक विषयांचे सदर अभ्यासक्रमात प्रशिक्षण दिले जाणार आहे.
एम ए योगा हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान संकुलामार्फत चालविला जाणार असून २०१८ पासूनच सदर संकुलामार्फत पोस्ट ग्रज्यूएट डिप्लोमा इन डायटेटिक्स एंड न्युट्रीशन तसेच योग शिक्षक पदविका व एक्यूप्रेशर प्रमाणपत्र हे कौशल्य विकास केंद्राचे प्रमाणपत्र अभासक्रम चालविले जातात. या अभ्यासक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती संकुलाचे समन्वयक डॉ. अभिजित जगताप यांनी दिली. एम ए योगा तसेच आरोग्य विज्ञान संकुल अंतर्गत चालू असणाऱ्या इतर विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी संकुल समन्वयक डॉ. अभिजित जगताप यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.