पंप चालकांना सायंकाळी चारपर्यंत वेळ : पोलिसांच्या पंपावर सुरु आहे विक्री
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
पेट्रोल-डिझेलच्या विक्रीमध्ये गेल्या दोन महिन्यात मोठी घट झाली आहे. हा परिणाम दरवाढीमुळे नाही तर सायंकाळी चारनंतर पंप बंद केले जात असल्याने आहे. एकीकडे शहर आणि जिह्यात सायंकाळी चारनंतर सर्व पंप बंद केले जात असले तरी शहर आणि ग्रामीण पोलिसांचे पंप मात्र चालू आहेत.
जून महिन्यात शेवटच्या आठवडÎात शासनाच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी आदेश काढून सर्व दुकाने, पेट्रोल-डिझेल पंप बंद ठेवण्याचे आदेश दिले. एरवी सोलापुरात दररोज 72 हजार लिटर पेट्रोल आणि 24 हजार लिटर डिझेलची विक्री होते. लॉकडाऊनमुळे सायंकाळी चारनंतर पंप बंद केले जात असल्याने पेट्रोल-डिझेल विक्रीत जवळपास 50 टक्क्यांची घट झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
दर वाढत असले तरी वाहतुकीसाठी आवश्यक असल्याने पेट्रोल-डिझेलची मागणी कमी झाली नाही. सायंकाळी चारनंतर खासगी पंप बंद असल्याने पोलीसांच्या पंपावर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी होत असताना दिसत आहे. एकीकडे गर्दी टाळण्यासाठी शासनाने चारनंतर पंप बंद ठेवण्याचे आदेश असले तरी पोलीसांच्या पंपावर होणाऱया गर्दीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
आदेश आल्यानंतर वेळेमध्ये बदल
पूर्वीच्या तुलनेत पेट्रोल-डिझेल विक्रीमध्ये मोठी घट झाली आहे. लॉकडाऊनमुळे सायंकाळ चारनंतर पंप बंद ठेवण्याचे आदेश आहेत. शासनाकडून आदेश आल्यानंतर वेळेमध्ये बदल होईल.
– सुनील चव्हाण, पेट्रोल-डिझेल पंप चालक