तरूण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
गेली दहा महिने कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व बाजारपेठ बंद असल्याने आणि नागरिकांच्या हाताला काम नसल्याने गेली दहा महिने घरपट्टी भरण्यासंदर्भात कोणताही पाठपुरावा नगरपालिकेने केलेला नव्हता तसेच कोणतीही सक्ती केली नव्हती. मात्र, आता कोरोनाच्या संकटामुळे कोणत्याही शासकीय योजनेचे अनुदान वेळेवर मिळत नाही तसेच आत्ता झालेल्या पावसाने ही शहराचे प्रचंड नुकसान झालेले असून तात्काळ काही कामे करणे गरजेचे असल्याने नागरिकांनी आता घरपट्टी आणि नळ पट्टीचे आपली रक्कम भरून नगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी नगरपालिकेच्या कर्मवीर जगदाळे मामा सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये केले. या बैठकीला नगराध्यक्ष असिफ तांबोळी मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील सर्व नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले की सोलापूर जिल्ह्यातील बार्शी नगरपरिषद ही सर्वात मोठी नगरपरिषद आहे. या अगोदरच्या काळामध्ये बार्शी नगर परिषदेने अनेक विकास योजना राबवल्या आहेत त्यातील बरेचसे योजना पूर्ण झाले असून काही प्रगतिपथावर आहेत. बार्शी नगरपरिषदेच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या भगवंत मैदान या ठिकाणी मोठे स्टेडियम उभारण्याचे काम चालू आहे. शहरातील अनेक बगीचे विकसित केले आहेत त्यातील ऑक्सीजन पार्क, शंकेश्वर उद्यान बगीच्या यांचा समावेश आहे. गणेश नगर तलावाचे सुशोभीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. शहरांमध्ये अनेक ठिकाणी गटारी, रस्त्याचे निर्माण केलेले आहे तसेच शहराच्या हद्दवाढ भागांमध्येही अनेक विकासाची कामे राबवलेली आहेत.
मात्र, गेली वर्षभर कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व देशच बंद होता या काळामध्ये जसे प्रत्येक नागरिकाला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत होते. तशा प्रकारे बार्शी नगरपालिकेला ही आर्थिक चणचण भासू लागली आहे. दोन दिवसापूर्वी अतिवृष्टी झाल्याने शहराचे प्रचंड नुकसान झाले आहे अनेक नागरिकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत. या अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक रस्त्यांचे नुकसान झाले आहे. अनेक गटारी वाहून गेले असून शहरातील सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे आता बार्शी नगरपरिषदेची तिजोरी आर्थिक अडचणीत असून शहरातील सर्व विकासकामे करण्यासाठी आर्थिक चणचण भासत आहे. शासनाकडून वेळोवेळी येणारे अनुदान खूप तोटके येत असून विविध विकास कामांसाठी मंजूर करून आणलेले अनुदान हि नगरपालिकेस प्राप्त होत नाही त्यामुळे आता नगरपालिकेला नागरिकांच्या साथीची गरज असून आपणाकडे असलेली थकित घरपट्टी नळपट्टी तात्काळ भरावी जेणेकरून शहरातील विविध कामे हाती घेण्यात येतील आणि बार्शी शहर पूर्वपदावर आणता येईल असे आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी केले.
नगरसेवकांनी नागरिकांत मिसळावे
यावेळी झालेल्या बैठकीमध्ये आमदार राजेंद्र राऊत यांनी सर्व नगरसेवकांना आपापल्या वॉर्डात प्रभागात नागरिकात मिसळून चर्चा करण्याचे सूचना दिल्या. आमदार राऊत यांनी सांगितले की अनेक भागातून नागरिकांचे अडचणी बाबत फोन येत आहेत. अशा संकटाच्या परिस्थितीत नगरपालिकेची अडचण नागरिकांना समजून सांगावी आणि नागरिकांना घरपट्टी भरण्यासाठी उद्युक्त करावे यासाठी सर्व नगरसेवकांनी आपापल्या भागात घरोघरी जाऊन नागरिकांचे प्रबोधन करावे अशीही सूचना राऊत यांनी दिली.









