तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्ज माफ केलं त्याच धर्तीवर महिला बचत गटाची देखील दोन लाखापर्यंत कर्ज माफी करावे या मागणीसाठी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिलांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला.
यावेळी विविध मागण्यांचे घोषणांचे फलक हाती घेत जिल्ह्यातील बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. होते. बचत गटाचे कर्ज माफ झाले पाहिजे, भाऊसाहेब आंधळकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
या मोर्चास छत्रपती शिवाजी महाराज चौक पासुन सुरुवात झाली. तेथून मेकॅनिक चौक, सरस्वती चौक चार हुतात्मा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिद्धेश्वर मंदिर परिसर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनम गेट समोर आंदोलन समारोप झाले. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना बचत गटाचे कर्ज माफ करा व स्वर्गीय मीनाताई ठाकरे नावाने स्वतंत्र बँकेची स्थापना करण्याची मागणी देखील केल्याची माहिती आंधळकर यांनी दिली.