तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
आँर्केस्टामध्ये एकत्र काम करणार्या मित्रानेच मित्राचे अपहरण केल्याची घटना सोलापुरात घडली. विशाल पाटील असे अपहरण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी घडली असून सदर बझार पोलिसांनी काही तासात आरोपीला जेरबंद करुन अपह्त तरुणाची सुटका केली.
याबाबत पूजा विशाल पाटील (वय 33, रा. संजय नगर, कुमठा नाका, सोलापूर) यांनी फिर्याद दिली. विशाल हे बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास बाहेर जाऊन येतो असे सांगून घरातून गेले. त्यानंतर ते रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाही. दरम्यान पूजा यांनी सायंकाळच्या सुमारास संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता विशालचा मोबाईल बंद होता. दरम्यान, रात्री फिर्यादीच्या सासूच्या फोनवर फोन करुन आरोपींनी 30 हजारांची मागणी केली. शिवाय पोलिसांना सांगितल्यास विशालला जीवे मारण्याची धमकी दिली.यानंतर फिर्यादीने सासूच्या फोनवर आलेल्या नंबरवर संपर्क केला. त्यावेळी अपह्त विशाल बोलले, त्यांनी मला पकडले असून तीस हजारांची मागणी करीत असल्याचे सांगितले.
सकाळपर्यंत तीस हजारांचा बंदोबस्त कर, नाहीतर हे लोक मला मारुन टाकतील असेही विशाल यांनी फिर्यादीला सांगितले. दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा फोन करुन आरोपींनी फिर्यादीकडे पैशांची मागणी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, सदर बझार गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढत, कर्नाटकातील विजापूर येथून अपह्त तरुणाची सुटका करुन गुन्ह्यातील एकाच्या मुसक्या आवळल्या.
हि कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिती टिपरे, पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस हवालदार खाजप्पा आरेनवरू, पोलीस नाईक दयानंद वाडीकर, पोलीस कर्मचारी गणेश कानडे यांनी केली.









