कुर्डुवाडी / तरुण भारत संवाद प्रतिनिधी :
पिस्तूलाचा धाक दाखवून दोघा सराफा व्यावसायिकांना लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला गोपनीय माहिती आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे सहा.पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्या पथकाने अटक केली. पोलिसांसाठी २०२० हे वर्ष जणू अग्नीपरीक्षाच होती. मात्र या आरोपींचा छडा लावून या अग्निपरीक्षेत पोलिस उत्तीर्ण झाले आणि वर्षअखेर गोड झाला.
दोन महिन्याच्या आत पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटिव्ही व श्वानपथकाच्या मदतीने, गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळवून तांत्रिक कौशल्याचा वापर करुन पोलिस हल्लेखोरांपर्यंत पोहचले. दरम्यान एक संशयीत किशोर उर्फ अप्पा बाळू ढवळे रा.कुर्डुवाडी याला ताब्यात घेऊन त्याकडे चौकशी केली असता गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या आणखी तिघा जणांची नावे उघड झाली. त्यामध्ये पुण्यातील सराईत गुन्हेगार निलेश विजय गायकवाड,मनोज हाडे,अशोक कसबे यांनी किशोर उर्फ अप्पा बाळू ढवळे याच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून अटक केलेल्या आरोपीस माढा न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरु असल्याचे तपासी अधिकारी सहा पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांनी सांगितले.
हा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ.विशाल हिरे व पोलिस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई दत्ता सोमवाड, पोलिस शिपाई सागर गवळी, पोलिस शिपाई संभाजी शिंदे, पोलिस शिपाई अन्वर आतार सायबर क्राईम सोलापुर,पोलिस शिपाई माळी सायबर क्राईम सोलापुर आदींनी ही कामगिरी केली









