तरुण भारत संवाद वार्ताहर / पंढरपूर
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी भगीरथ भारत भालके यांना देण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करुन दिली.
अतिशय अतीतटीच्या सुरू असलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा करण्यात वेळ लागला. अखेर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या मान्यतेने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर करीत असल्याचे सांगण्यात आले. भगीरथ भालके हे दिवंगत आमदार कै. भारत भालके यांचे सुपुत्र आहेत.
रविवारी संध्याकाळी भाजपाकडून मंगळवेढा येथील उद्योजक समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून जयश्रीताई भालके किंवा भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता होती. परंतु भगीरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आल्याने दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची जागा जिंकणे भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची बनले आहे









