प्रतिनिधी / सोलापूर
तडकाफडकी बदली केलेल्या नगर सचिवानां परत त्याच ठिकाणी नियुक्ती करा. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांनी दिला आहे.
एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांना शुक्रवारी लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, गुरुवारी अचानक नगर सचिव रऊफ बागवान यांची बदली केली आहे. नियमाप्रमाणे 90 दिवसानंतर जे विषय सभागृहात झालेले नाहीत, ते विषय शासनाकडे पाठविणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्यानूसार बागवान यांनी 44 विषय 90 दिवसात सभागृहात न आल्यामुळे आयुक्तांकडे पाठविले आहेत. त्यांनी नियमांची अंमलबजावणी केली आहे. या 44 विषयात मलीदा न मिळाल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी त्याचा राग नगर सचिवावर काढला आहे.
तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबधित नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा. तसेच नगर सचिव बागवान यांनी जर कायदयाचा भंग केला असेल किंवा भ्रष्टाचार केला असेल, तर त्यांच्यावर जरुर कारवाई व्हावी. परंतु ४४ विषयात टक्केवारी न मिळाल्यामुळे त्यांचा नाहक बळी गेला आहे. तरी रऊफ बागवान यांची परत नगर सचिव म्हणून नियुक्ती करावी. अन्यथा एमआयएम कडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांनी दिला आहे.
Previous Articleमुलीच्या वाढदिनी कोविड सेंटरला रुग्णवाहिका
Next Article सातारा जिल्ह्यात 855 नागरिकांना दिला डिस्चार्ज









