नगरपरिषद वगळता इतर ठिकाणी लोकांचा सर्रास रस्त्यावर वावर
प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहर वगळता जिह्यात आज शुक्रवारी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असले तरी ग्रामीण भागात या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून आले. नगरपरिषद असलेल्या ठिकाणी काही प्रमाणात दुकाने बंद करण्यात आली होती तर इतर छोटी गावे आणि वाडÎावस्त्यांवर या लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज 21 मे पासून ग्रामीण भागात कडक लॉकडाऊनचा आदेश काढला असून पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माळशिरस, सांगोला इत्यादी तालुक्याच्या ठिकाणी सकाळी दुकाने बंद होती तर ग्रामीण भागात मात्र दिवसभर दुकाने चालूच होती. सॅनिटायझर, हॅण्डवॉश, सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर हे सर्व नियम ग्रामीण भागात धाब्यावर बसवले असल्याचे दिसून आले. मोहोळ, अक्कलकोट, बार्शी या ठिकाणी रस्त्यावर फिरणाऱया लोकांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. परंतु पोलीस आणि आरोग्य विभागाचे अधिकारी ग्रामीण भागात सर्वत्र फिरु न शकल्यामुळे नागरिकांचा वावर रस्त्यावर राजरोसपणे दिसून येत होता.









