तालुका प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील मोट्याळ येथील विठ्ठल राम सुरवसे या शेतकऱ्याची कुरनुर धरणावरील दहा एचपी पाणबुडी कृषी पंप अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. ही घटना दि २० जुलै रोजी कुरनुर धरणावरील पिचिंगवर निदर्शनास आली. याबाबत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, मोट्याळ येथील शेतकरी विठ्ठल राम सुरवसे वय ३२ यांनी पिकास पाणी देण्यासाठी कुरनुर धरणावर २२ हजार किंमतीचे १० एच पी ची एन्सन्स कंपनीची पाणबुडी मोटार बसवली होती. दि १६ रोजी धरणातील पाणी वाढत असल्याने त्या शेतकऱ्यांनी ती मोटार पाण्याबाहेर काढून धरणाच्या बांधावर ठेवली होती. दि २० रोजी ही मोटार त्या बांधावरून अज्ञान चोरट्यांनी लाबाडीने चोरून पोबारा केल्याचे समजले. त्यामुळे अज्ञात चोरट्यांविरुद्ध विठ्ठल राम सुरवसे यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार फिरोज मियावाले हे करीत आहेत.









