ऑनलाईन टीम / सोलापूर
सोलापूर येथील होटगी रस्त्यावर जुगार अड्ड्यावर छापा टाकत पोलीसांनी कर्नाटकातील माजी आमदार रवी पाटील याच्यासह ३१ जणांना अटक केली. या छाप्यात सुमारे सहा लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रवी पाटील हा जुगार अड्डा चालवित होता.
रवी शंकरप्पा पाटील हे पोलिसांनी दिलेल्या नुसार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. यानंतर ते राजकारणात सक्रिय होऊन शेजारच्या कर्नाटकातील इंडी (जि. विजापूर) येथून सलग तीनवेळा आमदार झाले होते. एकदा त्यांनी सोलापूर लोकसभेची निवडणूकही लढविली होती. तत्पूर्वी, ते सोलापूर महापालिकेवरही निवडून गेले होते. स्वतःची टोळी तयार करून खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, अपहरण, खंडणी यासह इतर अनेक गुन्हे रवी पाटील यांच्यावर नोंद होते. त्यांच्यावर तत्कालीन ‘टाडा’, ‘रासुका’ आदी कायद्याखालीही कारवाई झाली होती.
बलात्काराच्या खटल्यात त्यांना सोलापूरच्या सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षाही सुनावली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयात त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, जनता दल, भाजप, शिवसेना आदी सर्व प्रमुख पक्षांशी त्यांची जवळीक राहिली आहे. सोलापूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त शहीद अशोक कामटे यांनी रवी पाटील यांच्या मुसक्या आवळताना केलेला बळाचा वापर त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता.