प्रतिनिधी /बेळगाव
केएलई संस्था व केंद्र सरकार यांच्यामध्ये दर्जेदार व उपयुक्त जातीच्या सोयाबीन बियाणे पुरविण्याबाबत करार झाला आहे. सोयाबीनचे उत्पादन वाढविणे व शेतकऱयांना त्यासाठी प्रोत्साहन देणे या हेतूने हा करार झाला आहे. दर्जेदार बियाणांचा पुरवठा करणे महत्त्वाचे असूनही अनेक राज्यांमध्ये त्याचा तुटवडा आहे. हे लक्षात घेऊन आयसीएआर-केएलई कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून नवीन जातीचे दर्जेदार बियाणे पुरवठा करण्याबाबत हा करार करण्यात आला.
यामुळे कर्नाटक राज्यातील शेतकरी विशेषतः बेळगाव जिल्हय़ातील सोयाबीनचे उत्पादन घेणाऱया शेतकऱयांना सुधारीत जातीची बियाणे उपलब्ध होणार आहेत. बेळगाव जिल्हय़ाचा सोयाबीनचे पिक घेण्यात दुसरा क्रमांक लागतो. कर्नाटकसह मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार या राज्यातील शेतकऱयांना सुद्धा याचा लाभ घेता येईल, असे केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी सांगितले.
कृषीतज्ञ जी. बी. विश्वनाथ यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. या योजनेचा कालावधी 5 वर्षे असून त्यासाठी शेतकऱयांना प्रशिक्षण दिले जाईल व सुधारीत बियाणे दिली जातील. इंदूर येथील भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेकडून नवीन बियाणे घेऊन ते लावल्यास एका वर्षात तीन हंगामी पिके घेता येतील. असेही ते म्हणाले.
या कराराप्रसंगी भारतीय सोयाबीन संस्थेच्या संचालिका डॉ. निता खांडेकर, केंद्र सरकारच्या दिल्लीतील कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे उपायुक्त बी. के. श्रीवास्तव, मत्तीकोप येथील विज्ञान केंद्राचे अध्यक्ष बी. आर. पाटील, शास्त्रज्ञ संजय गुप्ता, आयसीएआरचे संचालक वेंकट सुब्रमणीयन उपस्थित होते.









